प्रथमच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना युपी वॉरियर्झ व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अंतिम षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात अखेरीस युपी वॉरियर्झने एक चेंडू व तीन विकेट्स राखून सामना आपल्या नावे केला. मधल्या फळीतील फलंदाज किरण नवगिरे व ग्रेस हॅरिस यांनी तुफानी खेळ करत युपीचा विजय साकार केला.
https://twitter.com/wplt20/status/1632435420972851200?t=rG7j2-6ZYJ2LH4ZVTJFDog&s=19
डॉ. डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात गुजरातची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मेघना व डंकली यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, युपीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत नियमित अंतराने बळी मिळवले. मात्र, हरलीन देओलने एक बाजू लावून धरत शानदार 46 धावा केल्या. ऍश्ले गार्डनरने 25 व हेमलनाने 21 धावा करत गुजरातला 169 पर्यंत मजल मारून दिली. युपीसाठी दीप्ती शर्मा व सोफी एक्लस्टन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीची अवस्था 3 बाद 20 अशी झाली. त्यावेळी सोलापूरच्या किरण नवगिरे व दीप्ती शर्मा यांनी 66 धावांची भागीदारी केली. किरणने 43 चेंडूवर 53 धावांची खेळी केली. मात्र, किम ग्राथने केवळ तीन धावांच्या अंतरात तीन बळी मिळवत गुजरातला संकटात ढकलले. मात्र, त्यानंतर ग्रेस हॅरिसने डावाची सूत्रे हाती घेतली. अखेरच्या तीन षटकात युपीला विजयासाठी 53 धावांची गरज होती. हॅरिसने अखेरच्या 11 चेंडूंवर 43 धावांचा पाऊस पाडला. तिला सोफी एक्लस्टनने नाबाद 22 धावा करत तिला साथ दिली. अखेरच्या षटकात 19 धावांची गरज असताना हॅरिसने एक चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. तिने नाबाद 59 धावांची खेळी केली. गुजरातसाठी किम ग्राथने सर्वाधिक पाच बळी टिपले. गुजरातचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
(WPL 2023 UP Warriorz Beat Gujarat Giants By 3 Wickets Kiran Navgire And Grace Harris Shines)






