डब्ल्यूपीएलमध्ये शनिवारी (२४ जानेवारी) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (डीसी) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) ७ विकेट्सने पराभव केला आहे. आरसीबीचा हा चालू हंगामातील पहिलाच पराभव आहे. या विजयाने दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १०९ धावसंख्या उभारली. त्यामध्ये कर्णधार स्म्रिती मंधानाची खेळी सर्वाधिक होती. तिने एका बाजूने संघाच्या विकेट्स पडत असताना दुसरी बाजू पकडून ठेवत संघाचा धावफलक हलता ठेवला. तिने ३४ चेंडूत ३८ धावा केल्या. आरबीसीचे बाकी फलंदाज सर्वाधिक काळ खेळपट्टीवर टिकले नाही. त्यांचे आठ फलंदाज तर एकेरी धावसंख्येवर बाद झाले.
मंधानानंतर राधा यादवने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने १७ चेंडूत १८ धावा करत संघाच्या धावसंख्येत थोडीफार भर घातली. त्यांची या डावातील केवळ सलामीवीर भागीदारी उत्तम राहिली. मंधानाने ग्रेस हॅरिससह ३३ चेंडूत ३६ धावा केल्या. दिल्लीकडून मॅरिझाने कॅप हिने ४ षटकात १७ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
त्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीची सुरवात अडखळत झाली. त्यांनी चौथ्या षटकापर्यंत २ विकेट्स गमावत २४ धावा केल्या होत्या. शेफाली वर्मा १६ धावा करत बाद झाली. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने लॉराच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ५२ धावांची भागादारी केली. जेमिमा २४ धावांवर बाद झाली. त्यानंतर लॉराने कॅपच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला.
कॅप १९ धावांवर नाबाद राहिली तर लॉराने नाबाद ४२ धावा केल्या. यामुळे दिल्लीने ३ विकेट्स गमावत १५.४ षटकातच लक्ष्य साधले. यामध्ये आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स सायली सातघरेने घेतल्या. तिने ३ षटकात १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
दिल्लीला मोठ्या विजयाने नेट रनरेटमध्ये वाढ होऊन फायदा झाला. तसेच या हंगामातील बेंगलोरचा हा सलग ५ विजयानंतर पहिलाच पराभव होता, मात्र या पराभवाने त्यांना काही फरक पडला नाही, कारण ते आधीच प्लेऑफ्ससाठी पात्र ठरले आहेत.




