डब्ल्यूपीएलमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स समोरा-समोर आले. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी दोन्ही संघांना हा विजय आवश्यक होता. वडोदराच्या मैदानात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने बाजी मारली. त्यांनी ३ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. बेथ मुनीच्या ५८ धावा आणि अनुष्का शर्माच्या ३९ धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात ९ विकेट्स गमावत १७४ धावसंख्या उभारली. यामध्ये दिल्लीकडून सर्वाधिक विकेट्स श्री चरणीने घेतल्या. तिने ४ षटकात ३१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात ठीकच झाली असे म्हणता येईल. त्यांचे फलंदाज मोठे शॉट्स मारत धावा काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या विकेट्सही पडत राहिल्या. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरली. तिने १६ चेंडूत १६ धावा काढल्या. तिच्यानंतर विकेट्स पडण्याचा क्रम सुरूच राहिला. निकी प्रसाद आणि स्नेह राणा यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र सोफी डिवाईच्या गोलंदाजीपुढे ते हतबल दिसले.
दिल्लीला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. त्या षटकात सोफीच्या पहिल्या चेंडूत निकीने २ धावा घेतल्या. दुसरा चेंडूत एक धाव घेत स्नेह क्रिजवर आली. तिसऱ्या चेंडूत वाईड मिळाल्याने दिल्लीच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या, मात्र चौथ्याच चेंडूत स्नेहने आपली विकेट गमावली. आता २ चेंडूत ५ धावा असे समीकरण झाले. ५व्या चेंडूत एकेरी धाव घेतल्यावर ६व्या चेंडूत निकीही बाद झाली आणि हा सामना गुजरातने ३ धावांनी जिंकला. त्या दोघींनी ७व्या विकेटसाठी ३१ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली.
या सामन्यात निकीने २४ चेंडूत ९ चौकाराच्या साहय्याने ४७ धावा केल्या तर स्नेहने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहय्याने २९ धावा केल्या. सोफीने ४ षटकात ३७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तिच या सामन्याची सामनावीर ठरली.






