पुणे । ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यावर्षी पुण्यातील भूगाव येथे होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळणार नाही. ही स्पर्धा २० ते २४ डिसेंबर २०१७ या काळात होणार आहे.
विजय चौधरीने ही स्पर्धा २०१५, २०१६ आणि २०१७मध्ये जिंकली असून यावर्षी कुस्ती शौकिनांचे विजय कोणता निर्णय घेतो याकडे डोळे लागले होते. आजपर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात केवळ दोन खेळाडूंना ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावता आला असून त्यात विजयबरोबर नरसिंग यादवचा समावेश आहे.
यावर्षी विजय घेणार हिंदकेसरी स्पर्धेत भाग-
गेल्यावर्षी सणस मैदान पुणे येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत दुखापतग्रस्त असल्यामुळे विजय खेळू शकला नाही. परंतु यावर्षी त्याने हिंदकेसरी स्पर्धंच्या तयारीला सुरुवात केली आहे.
महा स्पोर्ट्सशी बोलताना विजय म्हणाला, “यावर्षी मी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भाग घेणार नाही. ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यावर नियमाने तसे करताही येत नाही. परंतु मी हिंद केसरी स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. मी रोज संध्याकाळी ५ ते १० या वेळेत सराव करत आहे. ही स्पर्धा अंदाजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार असल्याने मी चांगल्या सरावाला सुरुवात केली आहे.”
विजय या स्पर्धेत भाग घेणार किंवा नाही याबद्दल सोशल मीडियासह कुस्तीप्रेमींमध्ये मोठ्या चर्चा होत्या. याबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवाही पसरवल्या जात होत्या परंतु विजयने स्वतः समोर येत आपली भूमिका स्पष्ट मांडली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला १९६१ साली औरंगाबाद अधिवेशनाने सुरुवात झाली. या वर्षी स्पर्धेचे ६१वे वर्ष आहे. अशा या ६१ वर्षांची परंपरा असलेल्या स्पर्धेत विजय चौधरीच्या कामगिरीकडे कुस्ती शौकिनांचे कायम लक्ष लागून असते. विजयचा चाहतावर्गही महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात मोठा आहे. गेल्यावर्षी ही स्पर्धा जेव्हा पुण्यातील वारज्यात झाली ही तेव्हा विजय चौधरीने अभिजित कटकेचा पराभव करत ही तिसऱ्यांदा जिंकली होती.