विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार यासंदर्भात जगभरातले क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. प्रत्येक दिग्गज आपली वेगवेगळी भविष्यवाणी सांगतो आहे.
सध्या भारतीय कसोटी संघासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीवीराची भूमिका निभावत आहेत. याबाबत प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक माईक हेसनने आपले मत मांडले आहे.
हेसनने पीटीआईसोबत बोलताना सांगितले की, “रोहित आणि गिल सलामी जोडीसाठी तर आहेतच. परंतु भारतीय संघाने मयंक अगरवालबद्दल विचार करावा. मयंकने गेल्या न्यूझीलंड दौऱ्यावर चांगल्या धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून अर्धशतक करणाऱ्या ४ फालांदाजांपैकी मयंक एक होता.”
भारतीय संघाला विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी खूप कमी वेळ मिळाला आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघाला सराव सामनासुद्धा खेळायला मिळणार नाही. याउलट न्यूझीलंड संघाला २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळाली आहे. याच मालिकेद्वारे त्यांचा विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी अभ्यास होईल. तसेच गुरुवारपासून होणाऱ्या सामन्यासाठी ट्रेंट बोल्ट सुद्धा खेळणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यालासुद्धा सराव करण्याची संधी आहे. त्यामुळे एका गोलंदाजाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्याही मोठ्या सामन्यापूर्वी सराव सामने खेळणे हे प्रत्येक संघाला उपयुक्त ठरते. याविषयी हेसनने सांगितले की, “सगळीच मैदानं सारखीच नसतात. प्रत्येक खेळाडूला वातावरण आणि मैदानाप्रमाणे खेळ करावा लागतो. भारत मोठा संघ घेऊन आला आहे. त्यामुळे ते आपाआपसात सराव सामना खेळू शकतील. हा सामना ड्यूक चेंडूने होणार आहे. तो चेंडू चांगला स्विंग आणि सीम होणार. भारतीय संघ कदाचित दोन फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाज घेऊन उतरेल अशी आशा आहे.”
न्यूझीलंड संघाचा विचार करता कोलिन डि ग्रैंडहोम किंवा मिचेल सेंटनर या दोघांपैकी एकाला संधी मिळेल. न्यूझीलंड संघ हा ४ वेगवान गोलंदाजांसोबत मैदानात उतरू शकतो. तसेच न्यूझीलंड संघाकडे प्रमुख ५ फलंदाज आहेत, जे संघ सामोतोल राखण्यात मदत करतील.
माईक हेसनला आशा आहे कि रिषभ पंत यावेळेस भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करेल. गेल्या काही महिन्यांपासून पंतचा आत्माविश्वास द्विगुणीत झाला असून खालच्या फळीत तो भारताचा आधारस्तंभ बनेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्व कसोटी सामन्यापुर्वीच भारतीय क्रिकेटवर दु:खाचे सावट, माजी क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास
एका हंगामात १००० धावा चोपत भारतीय संघात दिमाखदार एंट्री, पुढे मोठ्या गुन्ह्यामुळे झाला कलंकित
भारत-पाकमधील ‘तो’ विश्वचषक सामना अन् कारगिल युद्ध; अझहर यांचा व्हिडिओ जिंकेल तुमचंही मन