क्रिकेटजगताचे लक्ष सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यावर लागले आहे. १८ ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साथउम्पटन येथे हा सामना रंगणार आहे. उभय संघ हा पहिलावहिला कसोटी अजिंक्यपद आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्रयस्थ ठिकाणी अर्थातच इंग्लंडमध्ये हा सामना होणार असल्याकारणाने खेळाडू तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
परंतु न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन याची नुकतीच इंग्लंडच्या मैदानावरील खराब कामगिरी संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. याखेरीज त्याची यापुर्वीची इंग्लंडमधील आकडेवारीही जास्त विशेष राहिली नाही.
न्यूझीलंडच्या कर्णधाराची इंग्लंडमधील फ्लॉप प्रदर्शन कायम
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ जून रोजी पार पडला असून हा सामना अनिर्णीत राहिला आहे. दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार दोन्ही डावात योगदान देऊ शकला नाही. तो पहिल्या डावात अवघ्या १३ धावांवर त्रिफळाचीत झाला. तर दुसऱ्या डावात केवळ एका धावेवर पायचित झाल्याने त्याला तंबूचा रस्ता पकडावा लागला.
चिंताजनक बाब अशी की, इंग्लंडमधील मागील १० कसोटी डावांपासून ३० वर्षीय विलियम्सनला सूर गवसताना दिसत नाही. त्याचा इंग्लंडच्या भूमीतील खराब फॉर्म अजूनही कायमच आहे. इंग्लंडमध्ये मागील ५ कसोटी सामन्यातील १० डावात फलंदाजी करताना त्याने केवळ २६१ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी केवळ २६.१० इतकी राहिली आहे.
विलियम्सनपेक्षा भुवनेश्वरची फलंदाजी सरासरी उत्तम
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी भारताच्या एका गोलंदाजाचीही फलंदाजी सरासरी विलियम्सनपेक्षा चांगली राहिली आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने विलियम्सनपेक्षा जास्त फलंदाजी सरासरीने इंग्लंडमध्ये धावा केल्या आहेत. त्याने ५ कसोटी सामन्यांतील १० डावात फलंदाजी करताना २७.४४ च्या सरासरीने २४७ धावा चोपल्या आहेत.