साउथम्पटन| बुधवार रोजी (२३ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना पार पडला. या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्या शानदार भागिदारीने भारताला विजयाचा स्वाद चाखू दिला नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा दुखापतीमधून सावरत होता. त्याने सामन्यात उतारण्यापुर्वी हाताला इजेंक्शन घेतले होते. त्यानंतर त्याने आपल्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ धावा बनवल्या होत्या. परंतु दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ १७० धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने पहिल्या डावात २४९ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना विजयासाठी शेवटच्या डावात फक्त १३९ धावांचे लक्ष्य मिळाले. संघाने दोन गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. संघाच्या या विजयात केन विलियम्सनने मोलाचा वाटा उचलला. त्याने दुसर्या डावात नाबाद ५२ धावा केल्या. त्याने रॉस टेलरसोबत (४७ धावा) तिसर्या विकेटसाठी ९६ धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला विजयी करत मैदान गाजवले.
विलियम्सनने २६६ चेंडूंचा सामना केला
तत्पुर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पहिल्या डावात तब्बल १७७ चेंडूंचा सामना केला होता. यावेळी ६ चौकारांच्या मदतीने त्याने ४९ धावा केल्या होत्या. त्यानंतरही संघाच्या दुसर्या डावात त्याने ८९ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद ५२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार मारले. म्हणजेच त्याने अंतिम सामन्यादरम्यान एकूण २६६ चेंडूंचा सामना केला आणि १०१ धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त डेवॉन कॉनवेने २०० चेंडू खेळले. इतर कोणत्याही फलंदाजाला २०० चेंडूंचा सामना करता आला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे विलियम्सन इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. पण भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात संघाला त्याची गरज होती आणि याची जाणीव असल्याने तो दुखापतीवर दुर्लक्ष करत इंजेक्शन घेऊन मैदानात उतरला व संघाला विजेताही बनवले.
आयसीसी ट्रॉफी जिंकणारा न्यूझीलंडचा दुसरा कर्णधार
कर्णधार म्हणून केन विलियम्सनने आयसीसीची पहिली ट्रॉफी जिंकली आहे. यासह २१ वर्षानंतर न्यूझीलंडला आयसीसीची ट्रॉफी मिळाली आहे. न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला हरवून २००० मध्ये प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी संघाचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग होता. २०१५ आणि २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ अखेर कसोटी अजिंक्यपद जिंकू शकला. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अद्याप कर्णधार म्हणून आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्यानंतर रॉस टेलरला आनंदाश्रू अनावर, मुलाखतीतही खूप रडला
कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात वॅटलिंगने अव्वल यष्टीरक्षक धोनीला पछाडलं, मोडला ‘हा’ विक्रम






