येत्या जून महिन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा महत्त्वपुर्ण सामना इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे होणार आहे. त्यामुळे उभय संघाच्या खेळाडूंपुढे इंग्लंडच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
त्यातही वेगवान गोलंदाजीस पोषक असलेल्या या मैदानावर भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर रोहित शर्मा संघर्ष करताना दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच त्याला इंग्लंडच्या मैदानावर कसोटी क्रिकेटचा अनुभवही फार कमी असल्याचे सर्वांना चिंता सतावत आहे. अशात भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सबा करीम यांनी रोहितविषयी वक्तव्य केले आहे.
रोहितला इंग्लंडच्या परिस्थितींमध्ये स्वतला सामावून घेण्यावर अधिक काम करावे लागणार असल्याचे सबा करीम यांनी सांगितले आहे. ते इंडिया न्यूजशी बोलत होते.
सबा करीम म्हणाले की, “रोहितसाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय आव्हानात्मक राहणार आहे, या गोष्टीची मी पूर्णपणे सहमत आहे. कारण इंग्लंडच्या मैदानावर चेंडू स्विंग होत असतात. विशेषत हा सामना ड्यूक बॉलने खेळला जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहेत. चेंडू तेव्हा जास्त वळण घेईल जेव्हा आकाशात ढग असतील आणि जेव्हा ऊन जास्त असेल तेव्हा खेळपट्टी फलंदाजीस पोषक असेल.”
“परंतु मला विश्वास आहे की, रोहित चांगली कामगिरी करेल. कारण त्याने मागील काही काळात स्वतमध्ये खूप बदल केले आहेत. तो मैदानावर एका नायकाप्रमाणे उतरतो. त्याला माहिती आहे की, आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन देण्यासाठी आपल्याला मोठी खेळी करावी लागणार आहे. तो जर चांगला खेळला तर निश्चितच भारतीय संघ चांगल्या मजबूत स्थितीत दिसेल,” असे त्यांनी पुढे म्हटले.
रोहितच्या इंग्लंडमधील कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, आतापर्यंत त्याला इंग्लंडमध्ये फक्त १ कसोटी सामना खेळण्याचा अनुभव आहे. त्यात त्याला केवळ ३४ धावा करण्यात यश आले होते. परंतु मागील काही काळातील त्याची कामगिरी आणि त्याची लय पाहता रोहित या महत्त्वाच्या सामन्यात आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीपमध्ये अशी राहिली आहे कोहली आणि विलियम्सनची कामगिरी, पाहा कोण राहिलं आहे श्रेष्ठ
“रिषभ पंत भविष्यातील कर्णधार आहे, यात कोणतीही शंका नाही”, भारताच्या महान क्रिकेटपटूचे मोठे भाष्य