मंगळवारी (०२ फेब्रुवारी) अँटिग्वा येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात १९ वर्षांखालील विश्वचषकाचा (U19 World Cup) उपांत्य सामना (Semi Final) झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ विकेट्सच्या नुकसानावर २९० धावा केल्या होत्या. या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९४ धावांवर पोस्टात आला. त्याचबरोबर भारतीय संघाने ९६ धावांनी मोठा विजय साजरा करत सलग चौथ्यावेळी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताच्या या यशात कर्णधार यश धूल (Yash Dhull) याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने या उपांत्य सामन्यात शानदार शतक झळकावत भारताच्या विजयाचा पाया रचला. याचसोबत त्याने विराट कोहली (Virat Kohli) व उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
यशचे लाजवाब शतक
या विश्वचषकातील पहिल्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८५ धावांची खेळी करणारा यश त्यानंतर पुढील दोन सामन्यांना मुकला. त्याला कोरोना संक्रमण झाले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने नाबाद खेळी केली. उपांत्य सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना तो पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. यशने या सामन्यात ११० चेंडूवर ११० धावा केल्या. यामध्ये एक षटकार व १० चौकारांचा समावेश होतो. त्याने उपकर्णधार शेख रशीदसह तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. मात्र, तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला.
विराट व उन्मुक्तची केली बरोबरी
या शतकासह यशने भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाचे माजी कर्णधार विराट कोहली व उन्मुक्त चंद यांची बरोबरी केली. या दोघांनंतर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात शतक झळकवणारा तो तिसरा कर्णधार ठरला. विशेष म्हणजे हे तिघेही दिल्लीचे रहिवासी आहेत.
विराटने २००८ मध्ये मलेशिया येथे झालेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध ७८ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावांची खेळी केली होती. तर, उन्मुक्तने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत नाबाद १११ धावा चोपलेल्या. म्हणजे भारतीय संघाने हे दोन्ही विश्वचषक आपल्या नावे केले होते.
भारतीय संघाचा दिमाखदार विजय
दिसणारे या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार यश धूल व उपकर्णधार शेख रशीद यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. धूलने शतक साजरे केले तर रशीद ९४ धावांवर बाद झाला. दिनेश बानाने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारतीय संघाला २९० पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलिया ची डाळ शिजली नाही. परिणामी, ऑस्ट्रेलियाचा संघ १९४ धावांवर सर्वबाद झाल्याने भारतीय संघाने ९६ धावांनी विजय साजरा करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या-






