शनिवारी (५ फेब्रुवारी ) आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (icc under 19 world cup) अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय १९ वर्षाखालील संघाने इंग्लंड १९ वर्षाखालील संघाला पराभूत करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. या विजयात भारतीय संघातील खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली होती. तर यश धूलने(Yash dhull) या संघाचे नेतृत्व केले होते. आता विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर यश धूलने आपल्या भविष्यातील योजनांचा खुलासा केला आहे.
विश्वविजेता कर्णधार यश धूलला जेव्हा भविष्यातील योजनांबाबत विचारण्यात आले, त्यावेळी त्याने म्हटले की, “मला फक्त क्रिकेट खेळायचं आहे. माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असेल. इतर गोष्टी आपोआप होतील. पाहूया काय होतं ते.” यश धूलने संघाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता.
तसेच भारतीय १९ वर्षाखालील संघाचा उपकर्णधार शेख राशिद बद्दल बोलताना यश धूल म्हणाला की, “शेख राशिद माझा खूप जवळचा मित्र आहे. आम्ही रात्रीच जेवण एकत्रच करतो. जेव्हा आम्ही अंतिम सामन्यात एकत्र फलंदाजी करत होतो. त्यावेळी आम्हाला पाच ते सात षटक शिल्लक ठेऊन हा सामना जिंकायचा होता.”
“आम्ही दोघेही बाद झालो, परंतु निशांत संधूने अप्रतिम खेळी केली. खेळपट्टीवर असताना राशिद मला सल्ला देत होता, ज्याचा मला भरपूर फायदा झाला होता. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळत होता, की मी जे निर्णय घेतोय ते योग्य आहेत. ” असे यश धुल म्हणाला.
तसेच विजयाचे श्रेय संघातील खेळाडूंना देत, यश धुलने म्हटले की, “हा खूप मोठा क्षण आहे. सर्वांना आपली सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे आम्ही ही स्पर्धा जिंकू शकलो. ही संपूर्ण संघाने घेतलेली मेहनत आहे. खेळाडूंनी योगदान देणं हे चांगल्या संघाचे लक्षण आहे. आम्ही सकारात्मक मानसिकता घेऊन पुढे आलो होतो. आशिया चषक स्पर्धेपासून आमच्या संघातील वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. रवी कुमारने चांगली गोलंदाजी केली आणि राज बावाने देखील चांगली सुरुवात करून दिली होती.”
महत्वाच्या बातम्या :
गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ
…नाहीतर दिल्ली कसोटीत १० विकेट्स कुंबळेसाठी ठरलं असतं स्वप्न
‘आजही तो पराभव बोचतो’, विराट कोहलीने सांगितली आयपीएलमधील भावुक आठवण