वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेचा (Icc under19 world cup) थरार सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने अफगाणिस्तान संघाला पराभूत करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. तर या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ (India vs Australia) आमने सामने येणार आहेत. हा सामना बुधवारी (२ फेब्रुवारी) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूल (Yash dhull) याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
उपांत्य फेरीचा सामना होण्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार यश धूलने म्हटले की, “या स्तरावर आम्हाला आणखी मेहनत करावी लागणार आहे. तसेच आम्हाला आणखी काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. आम्ही सातत्य ठेऊन सतत चांगली कामगिरी केली पाहिजे. जेणेकरून आमचा १९ वर्षाखालील संघापासून ते प्रथमश्रेणी क्रिकेटच्या प्रवास वेगाने होईल. त्यामुळे आम्हाला आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम करण्याची गरज आहे.”
भारतीय संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघातील काही खेळाडू आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये दिसून येणार आहेत. याबाबत बोलताना यश धूल म्हणाला की, “आयपीएल स्पर्धेचा लिलाव होणार आहे. मी वर्तमानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विचारात आहे. हे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल.”
तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याबद्दल बोलताना यश धूल म्हणाला की, “बांगलादेश विरुद्ध खेळताना भारतीय संघातील खेळाडू स्वस्तात माघारी परतले होते. परंतु ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाज आम्हाला जास्त त्रास देणार नाही. हे सामान्य गोलंदाजी आक्रमण आहे. कित्येक वर्षांपासून खेळून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आम्हाला भागीदारी वर लक्ष केंद्रित करायचं आहे. तसेच अंतिम षटकांमध्ये आम्हाला धावा गोळा करायच्या आहेत.” या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सलग चौथ्यांदा एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यास इच्छुक असेल.
महत्वाच्या बातम्या:
मेगा लिलावात ‘या’ ५ गोलंदाजांचा गच्च भरणार खिसा; पर्पल पटेलचं मात्र नाव नाही
“इतकी उत्सुकता वाढवायची काय गरज” लखनऊ संघाच्या लोगोचे अनावरण होताच चाहत्यांनी केले ट्रोल
हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्यक्तव्यांनी निवडकर्त्यांनाच ठरवले खोटे? वाचा सविस्तर