मुंबई:- चारचौघे मित्र मंडळ या मुंबई शहरच्या सामनाधिकाऱ्यांच्या संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश क्रीडा मंडळ यांनी द्वितीय, तर रण झुंजार क्रीडा मंडळ यांनी तृतीय श्रेणी गटात अंतिम विजेतेपद मिळवले. यश मंडळाचा तेजस शिंदे द्वितीय, तर श्री गणेशचा सिद्धेश सावंत तृतीय श्रेणी गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने श्रमिक जिमखाना येथे झालेल्या द्वितीय श्रेणीच्या अंतिम सामन्यात यश मंडळाने महालक्ष्मी मंडळाचा २८-२३ असे पराभूत करीत जेतेपदाचा चषक पटकाविला. अल्केश विचारे, तेजस शिंदे यांनी सुरुवातीपासून जोरदार चढाया करीत १४-०८ अशी आघाडी घेतली होती. त्यांना ओमकार मांजेकरची पकडीची उत्तम साथ लाभली. दुसऱ्या डावात मात्र सुर सापडलेल्या महालक्ष्मीच्या ओमकार व जयवंत या सुतार बंधूंनी कडवी लढत देत सामन्यात रंगत आणली.
तृतीय श्रेणीच्या अंतिम सामन्यात रण झुंजार मंडळाने श्री गणेश व्यायाम शाळेचा कडवा प्रतिकार २९-२८ असा निसटता मोडून काढत विजेतेपदाचा चषक उंचाविला. पूर्वार्धात ०८-१७ अशा पिछाडीवर पडलेल्या रण झुंजारने उत्तरार्धात मात्र जोरदार प्रतिकार करीत एका गुणाने जेतेपदाचा मुकुट आपल्या शिरपेचात रोवला. अमोल चव्हाण, मंगेश सुहासे यांच्या उत्तरार्धातील धारदार चढायांने या विजयाची किमया साधली. त्यांना उत्तम पकडी करीत सिद्धेश बंड यांनी छान साथ दिली. सिद्धेश सावंत, सुशांत मेगाणे यांनी पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ करीत श्री गणेशला ९ गुणांची मोठी आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते. पण उत्तरार्धात मात्र ते अगदीच ढेपाळले. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या अगोदर झालेल्या द्वितीय श्रेणीच्या उपांत्य सामन्यात यश मंडळाने श्री साईनाथ मंडळाचा (२९-२३) असा, श्री महालक्ष्मीने आकांक्षा मंडळाला ५-५ चढायांच्या डावात ३२-२८(७-३) असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. यश मंडळाचा जयेश काणेकर स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा, तर श्री महालक्ष्मीचा ओमकार सुतार चढाईचा उत्कृष्ट खेळाडू ठरला. तृतीय श्रेणी गटात रण झुंजारने प्रगती मंडळाला २८-२९ असे, तर श्री गणेश व्यायाम शाळेने बाळ गोपाळ मंडळाला ४१-२५ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. गणेश चव्हाण, मंगेश सूहासे हे दोन्ही रण झुंजार मंडळाचे खेळाडू अनुक्रमे पकडीचे आणि चढाईचे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरले.
महत्वाच्या बातम्या –
‘स्पोर्टिका श्री’वरही सागर कातुर्डेची मोहोर
दहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेस 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ