दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १९३ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल अवघ्या १२ धावांवर माघारी परतला. तो मोठी खेळी करू शकला नाही, पण यादरम्यान त्याने विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या सामन्यात राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. एका बाजूने वैभव सूर्यवंशी तुफान फटकेबाजी करत होता. तर दुसरीकडे ३ चौकार खेचून यशस्वी जैस्वालने १२ धावा केल्या. त्यानंतर लुंगी एन्गिडीने जैस्वालला बाद करत माघारी धाडलं. पण बाद होण्याआधी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत.
यशस्वी जैस्वालने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीला मागे टाकलं आहे. या सामन्यात फलंदाजीला येण्याआधी त्याला ४००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी अवघ्या ३ धावांची गरज होती. यादरम्यान मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चौकार खेचून त्याने खातं उघडलं आणि टी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. जैस्वालने आपल्या टी-२० कारकिर्दीतील १२९ व्या डावात ४००० धावांचा पल्ला गाठला आहे.
या रेकॉर्डमध्ये जैस्वालने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४००० धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये जैस्वाल संयुक्तरित्या चौथ्या स्थानी पोहोचला आहे. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिलने १२९ व्या डावात ४००० धावांचा पल्ला गाठला होता. तर विराट कोहलीने हा कारनामा १३८ व्या डावात केला होता. आता यशस्वी जैस्वालने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.






