भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावलं. पहिल्या डावात खातंही उघडू न शकलेल्या यशस्वीनं दुसऱ्या डावात हुशारीनं फलंदाजी करत ऑस्ट्रेलियातील आपलं पहिलं शतक ठोकलं. तो 297 चेंडूत 161 धावा करून बाद झाला. यशस्वीनं या शतकासह अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यानं भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची बरोबरी केली आहे.
जयस्वालचा ऑस्ट्रेलियातील हा पहिलाच कसोटी सामना होता. त्यात त्यानं शतक झळकावलं. अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ही कामगिरी प्रथम एमएल जयसिंह यांनी 1967-68 मध्ये आणि नंतर सुनील गावस्कर यांनी 1977-78 मध्ये केली होती. आता यशस्वीनं या लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही शतकं दुसऱ्या डावात आली आहेत.
यशस्वी पुढील महिन्याच्या अखेरीस 23 वर्षांचा होईल. त्याआधी त्यानं सुनील गावस्करच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. 23 वर्षाचा होण्यापूर्वी गावस्कर यांनी चार कसोटी शतकं झळकावली होती. आता जयस्वालनंही हा पराक्रम केला आहे. 23 वर्षांचा होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरनं भारतासाठी सर्वाधिक आठ कसोटी शतकं झळकावली आहेत. या यादीत सचिननंतर रवी शास्त्री पाच शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
यशस्वीनं 2024 या कॅलेंडर वर्षात तिसरं शतक ठोकलं. 23 वर्षांचा होण्यापूर्वी भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत तो आता सचिनच्या बरोबरीला आला आहे. सचिननं 1992 मध्ये तीन शतकं झळकावली होती. या बाबतीत सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. गावस्कर यांनी 1971 आणि कांबळी यांनी 1993 मध्ये प्रत्येकी चार शतकं झळकावली होती.
हेही वाचा –
IND VS AUS; पर्थमध्ये तिसऱ्या दिवशीही खेळपट्टीचा रंग बदलला! टीम इंडियासाठी किती धावसंख्या सुरक्षित?
IND VS AUS; केएल राहुल-यशस्वी जयस्वालचा डंका! ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वोच्च सलामी भागिदारी
IPL 2025 Mega auction; सर्वात आधी या खेळाडूंवर लागणार बोली, या ठिकाणी पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग