भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालसाठी हे वर्ष खूप चांगलं गेलं आहे. तो 2024 मध्ये 1000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यशस्वीनं पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यात हा टप्पा गाठला. या सामन्यात त्यानं अवघ्या 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांसह 30 धावांची तुफानी खेळी केली.
यशस्वी जयस्वालनं वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्यानं एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. यशस्वीनं 2024 मध्ये आतापर्यंत फक्त 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 63.93 ची उत्कृष्ट सरासरी आणि 94.54 च्या स्ट्राइक रेटनं 1023 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 5 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली.
भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूबद्दल बोलायचं झालं, तर हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं 1992 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हा पराक्रम केला होता. त्यानंतर त्यानं 1994 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी याची पुनरावृत्ती केली. विराट कोहलीनं 2010 मध्ये 22 वर्षांचा असताना पहिल्यांदा एका कॅलेंडर वर्षात 1000 धावांचा टप्पा गाठला होता. आता या यादीत यशस्वी जयस्वालचंही नाव जोडलं गेलं आहे.
एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारे सर्वात तरुण भारतीय
सचिन तेंडुलकर (1992) – 19 वर्ष
रवी शास्त्री (1983) – 21 वर्ष
विनोद कांबळी (1993) – 21 वर्ष
सचिन तेंडुलकर (1994) – 21 वर्ष
दिनेश कार्तिक (2007) – 22 वर्ष
विराट कोहली (2010) – 22 वर्ष
यशस्वी जयस्वाल (2024)* – 22 वर्ष
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी जयस्वालची ही 21वी खेळी होती. त्यानं आतापर्यंत 10 वेळा 30 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह तो पहिल्या 21 डावांनंतर सर्वाधिक वेळा 30 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारतीय ठरला आहे. या बाबतीत त्यानं माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचा विक्रम मोडला.
पहिल्या 21 टी20 डावानंतर भारतासाठी सर्वाधिक वेळा 30 किंवा त्याहून अधिक धावा
यशस्वी जयस्वाल* – 10
सुरेश रैना – 9
युवराज सिंग – 9
विराट कोहली – 9
सूर्यकुमार यादव – 9
ईशान किशन – 8
मनीष पांडे – 8
हेही वाचा –
यशस्वीचा धमाका, बिश्नोईच्या फिरकीची जादू….भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका सहज खिशात घातली
5 कारणं ज्यामुळे टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला, श्रीलंका बनली चॅम्पियन
क्रिकेटमधील अत्यंत दुर्मिळ घटना, ओव्हर थ्रो न होता आयर्लंडने धावत पूर्ण केल्या 5 धावा – Video