पुणे । मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात सायना देशपांडेने तर, मुलांच्या गटात यशराज दळवी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित सायना देशपांडे हिने रुमा गाईकैवारीचा 6-2, 6-1असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सायना हि विखे पाटील शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून संदीप किर्तने टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक संदीप किर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. याआधी तिने यावर्षी मुंबई येथे 14 वर्षाखालील चॅम्पियन सिरिज स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित यशराज दळवी याने तिसऱ्या मानांकित दक्ष अगरवालचा 6-2, 6-2असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. यशराज एमआयटी शाळेत नववी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक आदित्य मडकेकर आणि कैफी अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यशराजचे या वर्षातील या गटातील हे पहिलेच विजेतेपद आहे. अनर्घ हा सोलारिस क्लब येतेच प्रशिक्षक आदित्य मडकेकर आणि कैफी अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत दक्ष अगरवालने अनर्घ गांगुलीच्या साथीत इंद्रजीत बोराडे व रोहन फुले यांचा 6-1, 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात सिया देशमुख व रुमा गाईकैवारी या जोडीने लोलाक्षी कांकरिया व समीक्षा श्रॉफ यांचा 7-5, 6-3असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण शीप्र मंडळी चे क्रीडा समितीचे चेअरमन अशोक वझे, चितळे बंधू मिठाईवालेचे एस आर चितळे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, अपर्णा वाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मंदार वाकणकर, सुपरवायझर अवनी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: अंतिम फेरी: 16 वर्षाखालील मुली: सायना देशपांडे(5)वि.वि.रुमा गाईकैवारी 6-2, 6-1;
16वर्षाखालील मुले:
यशराज दळवी(2)वि.वि.दक्ष अगरवाल(3) 6-2, 6-2;
दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले: दक्ष अगरवाल/अनर्घ गांगुली(1)वि.वि.इंद्रजीत बोराडे/रोहन फुले 6-1, 6-3;
मुली: सिया देशमुख/रुमा गाईकैवारी वि.वि.लोलाक्षी कांकरिया/समीक्षा श्रॉफ(3)7-5, 6-3.