खेळाडूंचे प्रदर्शन आणि सध्याचा फॉर्म यावरून हे स्पष्ट झाले आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2026) भारताचा मुख्य यष्टीरक्षक कोण असेल. मात्र, या विषयावर दिग्गजांची मते येणे अजूनही सुरूच आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तर या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी शनिवारचा सामना संपण्याचीही वाट पाहिली नाही. भारतीय संघ व्यवस्थापन सध्या काय विचार करत असेल, यावर गावस्करांनी सविस्तर प्रकाश टाकला. संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या वादावर ‘सनी’ यांनी आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले, “मला वाटते की निवड समितीने संजू सॅमसनला पुरेसे देऊन अगदी योग्य निर्णय घेतला होता. पण आता इशान किशनच्या खेळी समोर आहेत आणि तिलक वर्मासाठीही मोठी संधी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताची फलंदाजीची फळी आता पूर्णपणे निश्चित झाल्यासारखी वाटत आहे.” यात शंका नाही की, मेगा विश्वचषकापूर्वी सॅमसन विरुद्ध इशान या वादात, इशान किशनने ठोकलेल्या वादळी शतकाने चाहत्यांच्या मनातील संभ्रम किमान सध्या तरी दूर केला आहे.
संजूला संघातून डच्चू देण्याच्या प्रश्नावर गावस्कर म्हणाले, “त्याला (संजूला) संघातून बाहेर करणे अत्यंत कठीण आहे. पण तुम्ही त्याला कुणाच्या जागी वगळणार? या स्तरावर तिलक वर्माने स्वतःला सिद्ध केले आहे. संजू सॅमसनने देखील स्वतःला एक परफॉर्मर म्हणून सिद्ध केले आहे, पण सध्या तो फॉर्ममध्ये नाही. येथे सॅमसनच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही, तर प्रश्न त्याच्या फॉर्मचा आहे.”
गावस्कर पुढे म्हणाले, “विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही मोठी जोखीम पत्करू शकत नाही. पाच सामन्यांत संधी मिळाल्यानंतरही धावा न निघाल्यामुळे निश्चितच त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला असावा. तसेच, तो ज्या पद्धतीने बाद झाला ते देखील निराशाजनक होते. जोपर्यंत तिलक वर्मा तंदुरुस्त आहे, तोपर्यंत मला वाटत नाही की ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताच्या पहिल्या सामन्यात सॅमसन अंतिम ११ (Playing XI) चा भाग असेल.” गावस्करांनी आपल्या विधानातून हे स्पष्ट केले की, जर तिलक वर्मा तंदुरुस्त असेल, तर संजूला इशान किशनसाठी जागा रिकामी करावी लागेल. संजूला संघात स्थान मिळवण्यासाठी तिलक वर्माचे अनफिट असणे हीच एकमेव शक्यता उरली आहे.






