---Advertisement---

भविष्यात भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळ्याची क्षमता ठेवणारे ३ युवा गोलंदाज

On: बुधवार, जुलै 8, 2020 5:29 PM
---Advertisement---

सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजीची प्रशंसा जगभर होत आहे. खरं तर भारतीय संघ आपल्या चांगल्या कामगिरीमुळे आज यशाच्या शिखरावर आहे. यातील बरेचसे श्रेय भारताच्या वेगवान गोलंदाजीला दिले पाहिजे.

भारतीय वेगवान गोलंदाजी फळीत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कसोटी स्पेशलिस्ट इशांत शर्मा यांचा समावेश आहे. तसेच दीपक चाहर, नवदीप सैनी या वेगवान गोलंदाजांची नावे सुद्धा घेतली जातात.

सध्या भारताचे वेगवान गोलंदाजांच आपला जलवा कायम ठेवून आहे. आपण कधी विचार केला आहे का? त्यांच्यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या टीममध्ये कोणते गोलंदाज दिसू शकतील? असे कोणते गोलंदाज आहेत जे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करू शकतील. त्याचाच या लेखात घेतलेला आढावा

३ वेगवान गोलंदाज भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची भविष्यात कमान सांभाळू शकतात

१. प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna)

प्रसिद्ध कृष्णा हा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज आहे. कृष्णाने अलीकडच्या काळात आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने खेळलेल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करून आश्चर्यचकित केले. त्याचा प्रमाणे त्याने शेवटच्या २ आयपीएल हंगामात उत्तम कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधले.

कृष्णाने आपल्या संघासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कर्नाटक संघाला सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करुन विजेतेपद मिळवून दिले. त्या सामन्यात तामिळनाडू संघाला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १४ धावांची आवश्यकता होती, परंतु कृष्णाने १३ धावा देत शानदार गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एका धावेनी विजेतेपद मिळवून दिले.

कृष्णाला टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज म्हटले जाते. देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारीकडे पाहता, कृष्णाने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २०.२६ च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ४१ अ दर्जाच्या सामन्यात ६७ आणि देशांतर्गत टी-२० च्या २८ सामन्यांत २४ विकेट्स घेतले आहेत. या प्रतिभावान गोलंदाजाला, जर संधी मिळाली तर भारतासाठी चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात आहे.

२. शिवम मावी (Shivam Mavi)

पृथ्वी शॉच्या नेतृत्वात, २०१८ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विश्वचषकात वेगवान गोलंदाज शिवम मावीने तुफान गोलंदाजी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्याकडे १४० किमीच्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.

मावीला २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने विकत घेतले. आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना मावीने ९ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळणारा शिवम मावी आता भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे.

मावीच्या देशांतर्गत आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने १६ अ दर्जाच्या सामन्यात ५.५८ च्या इकोनॉमी रेटने २२ विकेट्स घेतल्या आहेत. तर देशांतर्गत टी-२० मध्ये ९ सामन्यात ९.६४ च्या इकोनॉमी रेटने ५ विकेट मिळवल्या आहेत. मावीकडे भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य म्हणून बघितलं जातं.

३. आवेश खान (Avesh Khan)

मध्य प्रदेश क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानकडे देखील भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहील जातं. वेगवान गोलंदाज आवेशने गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आकडेवारीकडे बघायचं झाल्यास, अवेशने आतापर्यंत झालेल्या २६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २३.१ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये अवेशने १६ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत टी-२० मध्ये २१ सामन्यात ३५.३३ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत.

देशांतर्गत सामन्यातील प्रदर्शन पाहिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २०१७ मध्ये त्याला आपल्या संघात घेतले. आरसीबीकडून १ सामना खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये आवेशने १ विकेट घेतली. त्यानंतर, २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने २३ वर्षीय आवेशला ७० लाख रुपयांमध्ये विकत घेऊन आवेशचा त्याच्या संघात समावेश केला. या युवा वेगवान गोलंदाजात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची आणि संघासाठी सामना जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करण्याची क्षमता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---