दक्षिण आफ्रिका संघाचा युवा खेळाडू मोंडली खुमालो कोमामधून बाहेर आला असल्याची माहिती समोर आली आहे. २९ मे रोजी ब्रिजवॉटर येथील पबबाहेर त्याला काही अज्ञातांकडून बेदम मारहाण झाली होती. खुमालो समरसेटमधील नॉर्थ पेथर्टनकडून खेळतो. २०२०च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. शिवाय क्वाझुलु नॅटल इनलँडशीही त्याचा करार आहे. २० वर्षीय मोंडली हा नॉर्थ पेथर्टनचा व्यावसायिक परदेशी खेळाडू आहे. तो संघासोबत विजय साजरा करण्यासाठी गेला होता, तिथे ब्रिजवॉटरमधील ड्रॅगन राइज पबच्या बाहेर सकाळी त्याच्यावर हल्ला झाला होता.
खुमालोच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होता, त्यामुळे त्याच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. खुमालोचा नॉर्थ पेथर्टन संघातील सहकारी लॉयड आयरिशने स्पष्ट केले आहे की, तो कोमातून बाहेर आला आहे आणि त्याची प्रगती चांगली आहे.
माध्यमांशी बोलताना आयरिश म्हणाला की, “मोंडलीने काल चांगली प्रगती दाखवली आणि तो कोमातून बाहेर पडला आहे. त्याने खूप ताकद दाखवली आहे. तो त्याच्या आईबद्दल विचारत होता. त्याने काही काळ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी पाहिली आणि तो पुढील सामना कधी खेळणार हे देखील जाणून घ्यायचे होते. गेल्या २४ तासांत त्याची प्रगती आपण पाहिली आहे. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.”
दरम्यान, खुमालोबर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. या तपासाबाबत सांगताना सुप्रिटंडंट रिचर्ड टर्नर म्हणाले की, “खुमालोच्या कुटुंबाला त्याच्या प्रकृतीची तसेच आमच्या तपासातील प्रगतीची संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण तपास सुरू आहे. आम्ही घरोघरी जाऊन तपास करत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेजमधूनही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून सर्व पुरावे उपलब्ध होतील. त्यावेळी परिसरात जास्त लोक होते हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही आवाहन केले आहे की, ज्याने परिस्थिती पाहिली असेल त्यांनी पुढे येऊन साक्ष द्यावी. कुणाच्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ असेल, तर तो गोळा करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.”
या प्रकरणात पोलिसांकडून एका २७ वर्षीय आरोपीला अटक देखील करण्यात आले आहे. त्या व्यक्तीचा खुमालोवरील हल्ल्यांत समावेश असल्याचे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या पुराव्यांमध्ये पबच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही समावेश आहे. सोबतच, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भविष्यात कसोटी धोक्यात, पण ‘हे’ ३ देश वाचणार, आयसीसीच्या अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य
टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ संघ अवघ्या ८ धावांवर परतला तंबूत, मग विरोधी संघानेही ७ चेंडूत जिंकला सामना
यावर्षी टोटल फेल गेलेली मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षी कमबॅक करणार का?