युवराज सिंगच्या निवृत्तीची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. याला प्रतिउत्तर देताना त्याने निवृत्तीची वेळ निश्चित केली आहे. 2011 विश्वचषकाचा भारतीय संघाचा हिरो युवराज सिंगने निवृत्तीची घोषणा केली आहे.
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या 2019 आयसीसी विश्वचषकानंतर तो निवृत्ती घेणार असल्याचे युवराजने सांगितले आहे. तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 ला वेस्ट इंडिज विरूध्दच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता.
“मी 2019 पर्यंत कोणत्याही प्रकारचा सामना खेळणार आहे. 2019 हे वर्ष संपल्यानंतरच मी निवृत्ती घेणार आहे “, असे युवराजने एएनआयला सांगितले.
या 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने म्हटले की तो मागील दोन दशकापासून खेळत आहे तर त्याला कधी ना कधीतरी निवृत्त व्हावेच लागेल. ” सगळ्याजणांना कारकिर्दिबद्दल काहीतरी निर्णय हे घ्यावेच लागतात. मी 2000 या सालापासून आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. तर या 17-18 वर्षात मी संघात कधी आत तर कधी बाहेर होतो. म्हणून मी नक्कीच 2019 नंतर निवृत्त होणार आहे “, असेही तो म्हणाला.
युवराजने 2011 च्या विश्वचषकात 90.50 च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या तसेच 15 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा भाग होता.
पंजाबच्या आयपीएलमधील कामगिरीबाबत विचारले असता युवराज म्हणाला, ” सध्यातरी आम्ही पहिल्या चार संघामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटते यावर्षी आम्हांला चांगला संघ मिळाला आहे. कारण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात आत्तापर्यंतची कामगिरी उत्तम राहिली आहे. यामुळेच आम्ही पात्रता फेरी पार केली तर अंतिम सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. “
यावेळी युवराजने त्याचा संघसहकारी आणि स्टार फलंदाज ख्रिस गेलचे कौतुक केले. गेलने 19 एप्रिलला हैद्राबाद विरूध्द या आयपीएल मधील पहिले शतक केले होते.
” गेल हा माझा मैदानाबाहेरील सुध्दा एक चागंला मित्र आहे. तो एक उत्कृष्ठ, धोकादायक फलंदाज आहे “, असे युवराज म्हणाला.
टी-20 हा क्रिकेटचा एक अनपेक्षित प्रकार आहे. यामध्ये कोणीही कधीही जिंकतो. मात्र चेन्नई संघाची यातील कामगिरी कायमच सर्वोत्कृष्ठ राहिली आहे. कोलकाताचा संघ पण चांगला खेळत आहे. माझ्यामते हे दोन्ही संघ या आयपीएल मधील चांगले संघ असून आमचे प्रतिस्पर्धी असल्याचे सांगितले.