फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. या दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. याशिवाय युजी चहलनं धनश्रीसोबतचे त्याचे सर्व फोटो देखील डिलिट केले आहेत. धनश्रीनं युजवेंद्र सोबतचे फोटो डिलिट केले नसले, तरी तिनं त्याला अनफॉलो केलं आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातल्या घटस्फोटाची अफवा खरी आहे. सूत्रांनुसार, या दोघांमध्ये घटस्फोट झाला असून त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. ही बातमी सर्वात आधी 2023 मध्ये आली होती, जेव्हा धनश्रीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘चहल’ हे नाव हटवलं होतं. याच्या एका दिवसानंतर युजवेंद्रनं एक स्टोरी पोस्ट केली, ज्यात लिहिलं होतं, “नवं आयुष्य सुरू होणार आहे”. त्यावेळी चहलनं एक नोट जारी करून घटस्फोटाच्या अफवांना नाकारलं होतं. त्यानं म्हटलं होतं की, या सर्व अफवा असून चाहत्यांनी याकडे लक्ष देऊ नये.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न 11 डिसेंबर 2020 रोजी झालं. ‘झलक दिखला जा’ या रियालिटी शोमध्ये तिनं आपल्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितलं होतं. तिनं सांगितलं की, जेव्हा लॉकडाऊनमध्ये सर्व क्रिकेटपटू घरी बसून बोर होत होते, तेव्हा तिनं त्यांना डान्स शिकवण्याचा निर्णय घेतला. युजीनं मला डान्स शिकण्यासाठी संपर्क केला होता, असं तीनं सांगितलं.
34 वर्षीय युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तो 2024 टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. मात्र त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानं भारतासाठी शेवटचा वनडे सामना जानेवारी 2023 मध्ये तर शेवटचा टी20 सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जनं त्याला 18 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात सामिल केलंय.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर, शेवटच्या डावात गोलंदाजी करणार?
सिडनी कसोटीत रिषभ पंतचा जलवा! एकाच खेळीत मोडले कपिल-गंभीरचे मोठे रेकॉर्ड
रिषभ पंतचे अर्धशतक, स्कॉट बोलंडचा कहर, सिडनी कसोटीचा दुसरा दिवस आंबट-गोड