भारत विरुद्ध वेस्ट (India vs West Indies) यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi stadium) पार पडला. या सामन्यात युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra chahal) गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्याने वेस्ट इंडिजच्या ४ फलंदाजांना माघारी धाडले. याच कामगिरीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने या कामगिरीचे श्रेय संघातील दोन दिग्गज खेळाडूंना दिले आहे. कोण आहेत ते खेळाडू? चला पाहूया.
वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात युझवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४९ धावा खर्च करत वेस्ट इंडिजचे ४ गडी बाद केले. ज्यामध्ये निकोलस पुरन, कर्णधार कायरन पोलार्ड, फॅबियन ॲलेन आणि अल्जारी जोसेफ यांचा समावेश होता. त्याने आपल्या या यशाचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दिले आहे.
सामना झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, “मी सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली सोबत चर्चा केली होती. त्यांनी मला आधीच सांगितले होते की, या खेळपट्टीवर गती खूप महत्वाची असेल. त्यावेळी मी विचार केला की, जर जलद गतीचा चेंडू देखील फिरणार असेल तर, हेच करणं योग्य असेल. तर संथ गतीचा चेंडू व्हेरीएशन म्हणून टाकायचा आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की,” ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. मी जेव्हा वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी पाहिली तेव्हा मला जाणवले की, चेंडू खेळपट्टीवर फसून जातोय. तसेच मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केलेल्या चुकांचा व्हिडिओ देखील पाहिला होता. हे सर्व पाहून मी माझ्या गोलंदाजीवर मेहनत घेतली.”
युझवेंद्र चहलच्या ४ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ३ गडी बाद करण्याच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा डाव १७६ धावांवर संपुष्टात आणला होता. वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन जोडीला विजेतेपद
चहल अन् वॉशिंग्टनची जोडी ठरली सुपरहिट!! भारतीय खेळपट्टीवर केवळ दुसऱ्यांदाच केलाय असा कारनामा