झिम्बाब्वे क्रिकेट संघाने (Zimbabwe Cricket Team) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एक मोठी कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे हा टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. झिम्बाब्वेने गॅम्बियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ही कामगिरी केली. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 344 धावा केल्या. झिम्बाब्वेने हा एक विश्वविक्रम केला आहे.
आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक बी सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेतील 12वा सामना झिम्बाब्वे-गांबिया खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला.
खेळाच्या सुरूवातीलाच झिम्बाब्वेने जबरदस्त सुरुवात केली होती. ब्रायन जॉन बेनेट आणि तदिवानाशे मारूमणी या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी आपल्या तुफानी शैलीत फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. ब्रायन जॉन बेनेटने 26 चेंडूत 50 धावा केल्या, तर मारुमणीने 19 चेंडूत 62 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझाने (Sikandar Raza) 43 चेंडूत नाबाद 133 धावा ठोकल्या आणि टी20 मध्ये शतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला. अशा प्रकारे संघाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा इतिहास रचला.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC मध्ये सर्वाधिक वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद होणारे भारतीय फलंदाज
IND VS NZ; या खास खेळाडूचे तीन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन, रोहित शर्माचा मास्टर प्लॅन?
आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतची मोठी झेप, विराट-रोहित घसरले