आजपासून (23 जुलै) झिम्बाब्वे विरुद्ध भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरूवात होत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला झिम्बाब्वेमध्ये चांगल्या सुरूवातीची अपेक्षा आहे. दुसरीकडे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने ‘भारताला आम्ही आव्हान देण्यास तयार आहोत आणि ही मालिका एकतर्फी होणार नाही’, असे वक्तव्य मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. तर आता एक बातमी समोर येत आहे. एक खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे.
दुखापतीमुळे फलंदाज मिल्टन शुम्बा भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडल्याचे झिम्बाब्वे क्रिकेटने निश्चित केले आहे. उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यामुळे मंगळवारी करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये दुखापतीचे स्वरूप स्पष्ट झाले. त्यामुळे 25 वर्षीय डावखुरा फलंदाज या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी निवडकर्त्यांनी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
झिम्बाब्वेने शुम्बाच्या जागी इनोसेंट काइयाची निवड केली आहे. तो भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी संघात सामील झाला आहे. उर्वरित दोन सामने याच मैदानावर शनिवार (25 जुलै) आणि रविवारी (26 जुलै) खेळवले जातील.
जुलै 2024 मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब येथे भारताविरुद्ध खेळल्यानंतर काइयाचे झिम्बाब्वेच्या टी 20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. यजमान संघ आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषकातील विद्यमान विजेत्यांचा सामना करत असताना, हा अनुभवी आघाडीचा फलंदाज संघाच्या फलंदाजीला अधिक बळकटी देईल. त्यामुळे भारताचा प्रवास सोपा नसेल, असे दिसते.
टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघ
झिम्बाब्वे संघ – सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली माधेवेरे, तादिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझारबानी, डायन मायर्स, रिचर्ड एनगारावा, न्यूमन न्यामहुरी, इनोसेंट काइया, तफद्झवा त्सिगा.
भारतीय संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकुर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रवी बिश्नोई.






