झिम्बाब्वेनं बुधवारी (23 ऑक्टोबर) टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा स्कोर रचला. संघानं टी20 वर्ल्डकप रिजनल आफ्रिका क्वालिफायर सामन्यात गांबिया विरुद्ध 20 षटकांत 344 धावा केल्या. यापूर्वी हा रेकॉर्ड नेपाळच्या नावे होता, ज्यांनी 2023 मध्ये मंगोलिया विरुद्ध 314 धावा केल्या होत्या. यासह झिम्बाब्वेनं भारताचा 297 धावांचा रेकॉर्डही मोडला आहे.
या सामन्यात गांबियाच्या गोलंदाजांच्या नावे अनेक लाजीरवाणे रेकॉर्ड नोंदल्या गेले. संघाचा गोलंदाज मूसा जोरबातेहनं 4 षटकांत 93 धावा दिल्या. तर त्यांच्या 5 गोलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा दिल्या. या बातमीद्वारे जाणून घेऊया, या सामन्यात झिम्बाब्वेनं कोणकोणते विश्वविक्रम रचले.
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कोर – 344
टी20 क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय – 290
टी20 डावात सर्वाधिक षटकार – 27
टी20 डावात सर्वाधिक चौकार – 30
टी20 डावात सर्वाधिक 50+ स्कोर – 4
टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक – सिकंदर रझा, 33 चेंडू
टी20 डावात गोलंदाजानं दिलेल्या सर्वाधिक धावा – मूसा जोरबातेह, 93 धावा
टी20 डावात सर्वाधिक गोलंदाजांनी 50+ धावा दिल्या – 5
झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 344/4 धावा केल्या. सिकंदर रझानं 133 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीला आलेला यष्टिरक्षक फलंदाज तदिवनाशे मारुमणी यानं 19 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 62 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 326.32 होता. याशिवाय क्लाइव्ह मदंडेनं 17 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 53 धावा केल्या, सलामीला आलेल्या ब्रायन बेनेटनं 26 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गांबियाचा संघ 14.4 षटकांत अवघ्या 54 धावांवर ऑलआऊट झाला. संघासाठी केवळ एका फलंदाजानं दुहेरी आकडा ओलांडला आणि 12 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली.
हेही वाचा –
IND vs NZ: अश्विनने पहिल्याच सत्रात इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला टाकले मागे
झिम्बाब्वेने रचला इतिहास! बनला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ
टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक, उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी सामना