बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. खेळाडूंच्या दुखापतींमुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. संघाचा अनुभव वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने बळी मिळवणाऱ्या जयदेव उनाडकत याला संधी दिली गेली. तब्बल 12 वर्षानंतर त्याचा भारताच्या कसोटी संघात समावेश केला गेला. मात्र, आता बीसीसीआयने केलेल्या एका चुकीमुळे त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
भारतीय संघात बारा वर्षानंतर संधी मिळाली असली तरी, मंगळवारपर्यंत तो राजकोट येथेच होता. बुधवारी (14 डिसेंबर) मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे सुरू होईल. उनाडकत याला अद्याप बांगलादेशला जाण्यासाठी व्हीसा मिळालेला नाही.
बीसीसीआय नेहमी एखाद्या दौऱ्यासाठी घोषित झालेल्या संघातील खेळाडूंच्या व्हीसाची सोय करते. याबाबतची माहिती ते लॉजिस्टिक विभागाला देत असतात. मात्र, जयदेवची संघात अचानक निवड झाल्याने लॉजिस्टिक विभागाला याबाबत तातडीने कारवाई करावी लागली. मात्र, त्यांना यात यश लाभले नाही. त्यामुळे आता जय देव पहिल्या कसोटीला मुकेल. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराज व उमेश यादव या वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे.
उनाडकत 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला पहिला व अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात तो एकही बळी घेऊ शकला नव्हता. तसेच त्याने भारतीय संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना चार वर्षांपूर्वी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरेशी संधी मिळाली नसली तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत 96 प्रथमश्रेणी सामने खेळताना 353 बळी मिळवले आहेत. तर, 2019 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकलेल्या तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र संघाचा तो कर्णधार राहिला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही रिषभला काहीही बोलत नाही”; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा धक्कादायक खुलासा
अखेर सचिनच्या अर्जुनने ठेवले रणजीच्या रणांगणात पाऊल! संपली तीन वर्षांची प्रतीक्षा