क्रिकेट म्हटलं की धावा, विकेट यांची चर्चा नेहमीच होत असते. खेळाडू कोणीही असो, कसाही असो त्याला शून्यावर बाद व्हायला नक्कीच आवडत नसते. पण अनेक क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीत एकदातरी शून्यावर बाद होण्याची वेळ येते. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०९९ खेळाडू खेळले आहेत. त्यातील ३२४४ एवढे खेळाडू किमान एकदा तरी शून्यावर बाद झाले आहेत.
जेव्हा खेळाडू शून्यावर बाद होतो त्याला डक म्हटले जाते. पण या डक शब्दाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाला तर त्याला ‘गोल्डन डक’ असे म्हटले जाते. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी गोल्डन डकवर बाद होणे निराशाजनक असते. पण असे काही खेळाडू आहेत जे १० किंवा त्यापेक्षा अधिक वेळा गोल्डन डकवर बाद झाले आहेत. या लेखात वनडे सर्वाधिकवेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या १० खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
वनडेत सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणारे १० खेळाडू –
१०. वकार युनुस –
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनुस खानची गणना दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याची वासिम आक्रमबरोबरची जोडी अनेक फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली होती. पण असे असले तरी फलंदाजीत मात्र त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही आहे. युनुस १५ वेळा वनडेत शुन्यावर बाद झाला आहे. त्यातील ८ वेळा तो पहिल्याच चेंडूचा सामना करताना बाद झाला आहे. त्यामुळे तो वनडेत सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे.
९. डॅरेन पॉवेल –
वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज डॅरेन पॉवेलने कारकिर्दीत ५५ वनडे सामने खेळले आहेत. त्यातील २५ डावात त्याने फलंदाजी केली आहे. त्यात त्याने ११८ धावा केल्या आहेत. तो त्याच्या या वनडे कारकिर्दीत एकूण ८ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे या ८ ही वेळा तो गोल्डन डकवर बाद झाला आहे. तसेच तो केवळ ३ वेळाच त्याच्या वनडे कारकिर्दीत नाबाद राहिला आहे.
८. सनथ जयसुर्या –
श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू सनथ जयसुर्याने ४४५ वनडे सामने खेळले असून १३ हजारांहूनही अधिक धावा त्याने केल्या आहेत. तसेच वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो पहिल्या ५ खेळाडूंमध्ये आहे. पण असे असले तरी त्याच्या नावावर वनडेत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही आहे. तो ३४ वेळा वनडेत शुन्यावर बाद झाला आहे. त्यातील ९ वेळा तो गोल्डन डकवर बाद झाला आहे.
७. चामिंडा वास –
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू चामिंडा वासचाही या नकोशा यादीत समावेश आहे. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३२२ सामने खेळले असून त्यातील २२० डावात फलंदाजी केली आहे. त्याने २०२५ धावाही केल्या आहेत. पण तो २५ वेळा शुन्यावर बादही झाला आहे. त्यामुळे तो वनडेत सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या पहिल्या १० फलंदाजांमध्ये आहे. तसेच त्यातील ९ वेळा तो पहिल्या चेंडूचा सामना करताना म्हणजेच गोल्डन डकवर बाद झाला आहे.
६. वासिम आक्रम –
पाकिस्तानचा एक दिग्गज वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासिम आक्रमने गोलंदाजी करताना अनेक विक्रम केले आहेत. मात्र वनडेत फलंदाजी करताना त्याच्या नावावर २८ वेळा शुन्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही झाला आहे. तो वनडेत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातील १० वेळा तो पहिल्या चेंडूचा सामना करताना बाद झाला आहे.
५. मोईन खान –
वनडेत सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंच्या यादीत मोईन खान या आणखी एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश आहे. यष्टीरक्षक फलंदाज असलेला मोईन खान पाकिस्तान संघाचा ९० च्या दशकातील महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत २१९ सामने खेळताना १८३ डावात फलंदाजी केली आहे. त्यातील १७ डावात तो शुन्यावर बाद झाला आहे. यात ११ गोल्डन डकचा समावेश आहे. म्हणजेच तो ११ वेळा पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला आहे.
४. जवागल श्रीनाथ –
भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथने वनडेत अनेक विक्रम केले आहेत. तो ३१५ विकेट्सह वनडेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. पण असे असले तरी वनडेमध्ये फलंदाजीत मात्र त्याच्या नावावर भारताकडून सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होण्याचा नकोसा विक्रम देखील आहे. तो वनडेत १२१ डावात फलंदाजी करताना १९ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्यातील ११ वेळा तो गोल्डन डकवर बाद झाला आहे.
३. मुथय्या मुरलीधरन –
श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३४७ विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मात्र हा सर्वात यशस्वी गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक ५९ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्यातील तो वनडेत १६२ डावात फलंदाजी करताना २५ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. यामध्ये त्याच्या ११ गोल्डन डकचा समावेश आहे. म्हणजेच तो ११ वेळा पहिल्या चेंडूचा सामना करताना बाद झाला आहे.
२. शाहिद आफ्रिदी –
पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वनडे कारकिर्दीत ३९८ सामने खेळले आहेत. त्यातील ३६९ डावात त्याने फलंदाजी करताना ८००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पण याबरोबरच तो ३० वेळा वनडेत शुन्यावर बादही झाला आहे. तो वनडेत सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातील १२ वेळा तो गोल्डन डकवर बाद झाला आहे.
१. लसिथ मलिंगा –
श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगा वनडेत सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. मलिंगा एक यशस्वी गोलंदाज असला तरी वनडेत ११९ डावात फलंदाजी करताना मात्र २६ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्यातील १४ वेळा तो पहिल्या चेंडूचा सामना करताना म्हणजेच गोल्डन डकवर बाद झाला आहे.