कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच विकेट्स घेणं ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी कामगिरी असते. जर कर्णधार असताना तुम्ही ही कामगिरी केली तर तुमचं कर्तृत्व आणखी मोठे होतं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं ही कामगिरी करून दाखवली आहे. यासह तो महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला. या बातमीद्वारे जाणून घेऊया अशा भारतीय खेळाडूंबद्दल ज्यांनी कसोटीत कर्णधार असताना एका डावात 5 बळी घेतले.
(5) जसप्रीत बुमराह – जसप्रीत बुमराहनं पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात पाच बळी घेतले आणि कसोटीत फाईव्ह विकेट हॉल घेणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराह या सामन्यात भारतीय संघाची कमान सांभाळत आहे.
(4) विनू मांकड – कसोटीत कर्णधार म्हणून एका डावात पाच बळी घेणारा विनू मांकड हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्यानं 1955 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. कर्णधार म्हणून त्यानं हे एकदाच केलं.
(3) अनिल कुंबळे – भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनं कसोटीत कर्णधार म्हणून दोन वेळा फाईव्ह विकेट हॉल घेण्याची कामगिरी केली आहे. कुंबळेनं 2007 मध्ये एकाच महिन्यात दोनदा ही कामगिरी केली होती. प्रथम त्यानं पाकिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावातही त्यानं याची पुनरावृत्ती केली.
(2) कपिल देव – भारताचा सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू आणि महान कर्णधार कपिल देव यानं चार वेळा कर्णधार असताना फाईव्ह विकेट हॉल घेण्याचा पराक्रम केला आहे. कपिल देव यांनी बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. यानंतर त्यानं दोन वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध आणि एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार म्हणून एका डावात पाच बळी घेतले.
(1) बिशनसिंग बेदी – माजी महान डावखुरा फिरकीपटू बिशनसिंग बेदीनं कर्णधार म्हणून सर्वाधिक आठ वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. बेदीनं इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली. त्यानं भारतात चार वेळा आणि विदेशात चार वेळा हा पराक्रम केला.
हेही वाचा –
“मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करतो….”, मिचेल स्टार्कची हर्षित राणाला ‘धमकी’; मैदानावरील व्हिडिओ व्हायरल
IND vs AUS: यशस्वी जयस्वालने इतिहास रचला, हेड कोच गंभीरचा 16 वर्षे जुना विक्रम मोडला
तिलक वर्माचा भीमपराक्रम! टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू





