युएफा चॅम्पियन्स लीगच्या राउंड १६ च्या दूसऱ्या लेगच्या सामन्यांची काल सांगता झाली आणि त्याचबरोबर ८ संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला. रियल मॅड्रिडने पीएसजीचा पराभव केला तर जुवेंटसने टोट्टेन्हम हाॅटस्परला घरचा रस्ता दाखवला. काल झालेल्या मॅन्चेस्टर युनाएटेड विरुद्ध सेविल्ला सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. तर आजचा बार्सेलोना विरुद्ध चेल्सी सामना काही उलटफेर करेल का असा प्रश्न सर्वांसमोर होता.
कालच्या मॅन्चेस्टर युनाएटेडच्या घरच्या मैदानावर त्यांच्यासमोर सेविल्लाला पराभूत करायचे आव्हान होते. लीगमध्ये पाचव्या स्थानावरील सेविल्लाला युनाएटेडने या आधी कधीच पराभूत केले नव्हते त्याचा सुद्धा दबाव होता. पहिल्या लेगमध्ये ०-० ने सामना बरोबरीत सुटल्यानंतर या सामन्याचा पहिल्या हाफमध्ये युनाएटेडने सुमार कामगिरी करत सेविल्लाच्या खेळाडूंना सामना बरोबरीत राखण्यास हातभार लावला.
दूसऱ्या हाफमध्ये सामना शेवटच्या २० मिनिटात पोहचला असताना सेविल्लाने बेन येडेरला बदली खेळाडू म्हणुन मैदानात उतरवले आणि ही चाल त्यांना उपयोगी ठरली. मैदानावर येऊन अवघ्या २ मिनिटात सामन्याच्या ७४ मिनिटला त्याने गोल पोस्टच्या उजव्या कोपऱ्यात बाॅल मारत सामन्यात ०-१ ची आघाडी मिळवली. अवघ्या ४ मिनिटांनंतर बेनने आणखी एक हेडरने गोल मारत सेविल्लाला ०-२ ची आघाडी मिळवून दिली.
युनाएटेडला सामना जिंकायला १० मिनिटमध्ये ३ गोल पाहिजे होते पण ८४ व्या मिनिटला लुकाकुच्या एकमेव गोलवर त्यांना समाधान मानावे लागले आणि १-२ ने पराभवाबरोबरच त्यांचे अंतिम ८चे स्वप्न भंग झाले.
तर आज झालेल्या बार्सेलोना विरुद्ध चेल्सी सामन्याच्या पहिल्या लेगला दोन्ही संघांनी १-१ ने सामना बरोबरीत सोडवला होता. आज चेल्सी २०१२ ची पुनरावृत्ती करत बार्सेलोनाला पुन्हा घरच्या मैदानावर मात देणार का या प्रश्नानेच सामन्याची सुरुवात झाली आणि २ मिनिट ८ सेकंदात गोल करत मेस्सीने चेल्सीच्या डिफेंसला धक्का दिला. हा त्याच्या कारकिर्दितील सर्वात वेगवान गोल ठरला. मेस्सी, सुवारेझ आणि डेम्बेलेच्या अप्रतिम चालीनंतर मेस्सीने गोलकीपरच्या पायामधुन बाॅल काढत हा गोल नोंदवला.
पहिला गोल झाल्यानंतर चेल्सीने सामन्यावर आपली पकड मजबूत करायचा प्रयत्न केला पण २० मिनिटला झालेल्या एका चुकीचा फायदा मेस्सीने उचलला आणि डाव्या बाजूने चाल रचत डेम्बेलेला उजव्या बाजूला पास दिला त्याने त्याचा फायदा उचलत बाॅल गोल पोस्टच्या वरच्या कोपऱ्यात मारत २-० ची आघाडी मिळवून दिली. हा त्याचा बार्सेलोनातर्फे पहिला गोल होता. या नंतर चेल्सीला पहिला हाफ सामन्यावर पकड मिळवण्यात अपयश आले आणि पहिला हाफ २-० ने बार्सेलोनाच्या बाजूने संपला.
दूसऱ्या हाफची सुरुवात पण बार्सेलोनाने बाॅल आपल्या ताब्यात ठेवतच केली. सामन्याच्या ६३ व्या मिनिटला पुन्हा एकदा सुवारेझने मेस्सीला पास दिला आणि त्याने परत एकदा गोलकीपरच्या पायामधून बाॅल मारत गोल केला. हा त्याचा युसीएल मधला १०० वा गोल होता त्याच बरोबर १०० गोल करणारा तो रोनाल्डो नंतर जगातील दूसरा खेळाडू ठरला. ३-० ची आघाडी घेत बार्सेलोनाने सामन्याचा निकाल निश्चित केला. चेल्सीला गोल करण्यात अपयश आले आणि सामना ३-० ने बार्सेलोनाने जिंकला.
कालच्या सामन्यात १०० गोल्स करत मेस्सीने आणि बार्सेलोनाने केलेले काही विक्रम:-
-बार्सेलोनाने सलग ११ मोसमात उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
-मेस्सीने युसीएलच्या १२३ सामन्यात १०० गोल्स आणि ३० असिस्ट केले.
-आज मेस्सीचे इंग्लिश संघाविरुद्ध सर्वाधीक २० गोल्स झाले त्यात त्याने खालील संघांविरुद्ध केलेले गोल
९ अर्सेनल
६ मॅन्चेस्टर सिटी
३ चेल्सी
२ मॅन्चेस्टर युनाएटेड
-९ सप्टेंबर २०१७ नंतर आज पहिल्यांदा मेस्सीने उजव्या पायाने गोल केला. त्या दरम्यान ३० गोल्स मेस्सीने डाव्या पायाने केले आहेत.