पुणे। भारतात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी अडचणींचा सामना करीत भारताचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे आपल्यातील १ हजार खेळाडू निवडले जाणार असून त्यांना प्रत्येक वर्षी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत, पुढील ८ वर्षे ही रक्कम देण्यात येणार आहे. यातील खेळाडू भारतासाठी ऑलिंम्पिक पदक जिंकून आणतील, हीच आपल्या प्रधानमंत्र्यांची दृष्टी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी केले.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन पुण्यातील महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन सभागृहात झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, चेअरमन राजेंद्र सिंग, नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर मुक्ता टिळक यांसह स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
राजवर्धनसिंग राठोड म्हणाले, खेळाडूंना मेहनत करावी लागेल, हार-जीत पचवावी लागेल, हेच एका खेळाडूचे आयुष्य आहे. शिक्षण हे शाळेच्या वर्गापुरते मर्यादित नसते, खेळाच्या मैदानात जे शिक्षण मिळते ते कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. आपण मजबूत बनलात तर देश मजबूत होईल. आपण खेळाल तर संपूर्ण देश खेळेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण खेळा आणि स्वस्थ भारत निर्माण करा. स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाला भारत सरकार आज ख-या अर्थाने कार्यान्वित करीत आहे, यासाठी खेलो इंडिया युथ गेम्स हे उत्तम व्यासपीठ आहे. खेलो इंडिया स्पर्धा यावर्षी महाराष्ट्रात झाली असल्याने आम्ही महाराष्ट्रात पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार आहोत, औरंगाबादमध्ये हे विद्यापीठ उभारले जाणार आहे. खेळांचे स्टेडियम उभारण्याकरीता यापूर्वी तालुकास्तरावर १ कोटी रुपये दिले जात होते, ते आता ५ कोटी रुपये देणार आहोत. जिल्हा स्तरावर ८ कोटी रुपये देत होतो, ते आता १६ कोटी रुपये आणि विभागात २४ कोटी रुपये देत होतो, ते आता ४५ कोटी रुपये देण्यात येणार आहे. खेळांची मैदाने तयार करुन महाराष्ट्र देखील देश आणि जगाला चांगले खेळाडू देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण झाले. या समारंभासाठी राज्यातील अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच ज्येष्ठ ऑलिंपिकपटूंना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील शिववंदना सादर करण्यात आली. याद्वारे शिवकालीन इतिहास उलगडून दाखविण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमून गेले.
खेळाडू, प्रशिक्षक व अन्य पदाधिकारी मिळून १० हजार लोकांचा सहभाग स्पर्धेमध्ये असणार आहे. महोत्सवासाठी विविध राज्यांच्या खेळाडूंचे आगमन झाल्यामुळे क्रीडानगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा महोत्सवात ३६ राज्यांतील ६ हजार खेळाडू, १ हजार ८०० तांत्रिक अधिकारी, १ हजारहून अधिक संघटक आणि ७५०स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.