क्रिकेटमध्ये फाॅलोऑन सर्वांना माहित आहेच. तरीही ज्या क्रिकेटप्रेमींना माहित नाही, त्यांच्यासाठी. कधी-कधी एखाद्या संघाला फक्त एकच डाव खेळायला मिळतो. असे तेव्हा होते, जेव्हा प्रथम फलंदाजी (X) करणारा संघ मोठी धावसंख्या उभारतो आणि विरुद्ध संघ (Y) त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कमी धावांवरच सर्वबाद होतो.
यावेळी कमी धावा करणाऱ्या संघाला (Y) पहिल्यांदा फलंदाजी केलेला संघ (X) पुन्हा फलंदाजीला पाचारण करुन आधीचेच आव्हान पुर्ण करायवयास लावतो. हा निर्णय प्रथम फलंदाजी करणारा संघ (X) घेतो. परंतु हे सर्व होताना पहिल्या संघाच्या (X) धावा व दुसऱ्या संघाच्या (Y) धावा यांच्यात पहिल्या संघाच्या पहिल्या डावातील धावा या दुसऱ्या संघाच्या पहिल्या डावातील धावांपेक्षा २०० किंवा अधिक असाव्या लागतात. यालाच क्रिकेटच्या भाषेत फॉलोऑन देणे असे म्हणतात.
क्रिकेटमध्ये फाॅलोऑन दिल्यानंतर केवळ तीन सामने (Y) विरोधी संघाने जिंकले आहेत. त्यात इंग्लंडने दोन वेळा ऑस्ट्रेलियावर (१८९४ व १९८१ ) तर भारताला ऐतिहासिक कोलकाता कसोटीत (२००१) ऑस्ट्रेलियावरच विजय मिळवला होता.
एकदा का संघाला फॉलोऑन मिळाला की फलंदाजी करणे अतिशय कठीण समजले जाते. कारण अशा वेळी फॉलोऑन मिळालेल्या संघावर खूप दबाव असतो. अशा वेळी जर फलंदाज शतकी खेळी करून सामना जिंकून देत असेल किंवा अनिर्णित ठेवत असेल, तर मोठी गोष्ट समजली जाते. अशा वेळी बऱ्याच वेळा फलंदाजांना खूप चेंडूंचा सामनाही करावा लागतो. नाहीतर डावाने पराभव अटळ असतो.
भारतीय संघाला फॉलोऑन दिल्यानंतर विजय हजारे, सलीम दुराणी, पॉली उम्रीगर, दिलीप वेंगसरकर व सचिन तेंडूलकर यांची शतके वाया गेली आहेत. कारण त्या सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव झाला आहे.
दुसऱ्या बाजूला फॉलोऑननंतर शतकी खेळीचे विजयात रुपांतर करण्याचा करिष्मा भारतीय खेळाडूंमध्ये केवळ व्हिव्हिएस लक्ष्मण व राहुल द्रविडला करता आला आहे. ऐतिहासिक कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता.
विजय हजारे व व्हिव्हिएस लक्ष्मण हे असे दोन भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी दोन वेळा फॉलोऑननंतर शतकी खेळी केली आहे. हजारेंनी शतक केलेल्या एका सामन्यात भारताला पराभव पहायला लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या बाजूला लक्ष्मणने शतक केलेल्या एका सामन्यात टीम इंडिया विजयी झाली, तर एक सामना अनिर्णित राहिला.
फॉलोऑननंतर भारताकडून दिलीप सरदेसाई (नाबाद २००) व व्हिव्हिएस लक्ष्मण (२८१) हे दोनच खेळाडू द्विशतकी खेळी करु शकले आहेत. व्हिव्हिएस लक्ष्मणच्या २८१ धावा या तर भारताच्या कसोटी इतिहासातील एकेवेळी फंलदाजाने डावात केलेल्या सर्वोत्तम धावा होत्या. तो विक्रम पुढे सेहवागने मोडला.
भारतीय संघाला मुंबई शहरात दोन कसोटी सामन्यात फॉलोऑन मिळाल्यावर दोन्ही सामन्यात मिळून एकूण ४ शतके भारतीय खेळाडूंकडून पहायला मिळाली. पहिला सामना १९४८, तर दुसरा सामना १९६५मध्ये झाला होता.
भारतीय संघाला फॉलोऑन मिळाल्यावर भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्ध (४), वेस्ट इंडिजविरुद्ध (४), ऑस्ट्रेलियाविरुद्ध (३) व इंग्लंडविरुद्ध (३) शतके केली आहेत. तर प्रत्येकी १ शतक हे पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले आहे.
२०१०मध्ये नागपूर कसोटीत सचिन तेंडूलकरने केलेले शतक हे भारताला फॉलोऑन मिळाल्यानंतरचे शेवटचे शतक आहे. असा कारनामा पुन्हा कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही.
भारताला विरोधी संघाने फॉलोऑन दिल्यावर शतके करणारे फलंदाज
१४५- विजय हजारे विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९४८, ऍडलेड, भारतीय संघ डावाने पराभूत
११२- रुषी मोदी विरुद्ध वेस्ट इंडिज, १९४८, मुंबई, सामना अनिर्णित
नाबाद १३४- विजय हजारे विरुद्ध वेस्ट इंडिज, १९४८, मुंबई, सामना अनिर्णित
१०४- सलिम दुराणी विरुद्ध वेस्ट इंडिज, १९६२, पोर्ट ऑफ स्पेन, वेस्ट इंडिज ७ विकेट्सने विजयी
नाबाद १७२- पाॅली उम्रीगर विरुद्ध वेस्ट इंडिज, १९६२, पोर्ट ऑफ स्पेन, वेस्ट इंडिज ७ विकेट्सने विजयी
नाबाद १२२- बापु नाडकर्णी विरुद्ध इंग्लंड, १९६४, कानपूर, सामना अनिर्णित
नाबाद २००- दिलीप सरदेसाई विरुद्ध न्यूझीलंड, १९६५, मुंबई, सामना अनिर्णित
१०९- चंदू बोर्डे विरुद्ध न्यूझीलंड, १९६५, मुंबई, सामना अनिर्णित
१४८- मॅक पतौडी विरुद्ध इंग्लंड, १९६७, लीड्स, इंग्लंड विजयी ६ विकेट्स
१५७- दिलीप वेंगसरकर विरुद्ध इंग्लंड, १९८२, लीड्स, इंग्लंड विजयी ७ विकेट्स
नाबाद १०१- मोहिंदर अमरनाथ विरुद्ध पाकिस्तान, १९८४, लाहोर, सामना अनिर्णित
२८१- व्हिव्हिएस लक्ष्मण विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००१, कोलकाता, भारतीय संघ विजयी
१८०- राहुल द्रविड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००१, कोलकाता, भारतीय संघ विजयी
१३७- गौतम गंभीर विरुद्ध न्यूझीलंड, २००९, नेपीयर, सामना अनिर्णित
नाबाद १२४- व्हिव्हिएस लक्ष्मण विरुद्ध न्यूझीलंड, २००९, नेपीयर, सामना अनिर्णित
१००- सचिन तेंडूलकर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१०, नागपुर, दक्षिण आफ्रिका एक डाव व ६ धावांनी विजयी