पुणे| टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकाच्या कामगिरीनंतर प्रथमच देशातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ११ डिसेंबरपासून सुरू होईल.
स्पर्धेत हॉकी इंडियाशी संलग्न असलेल्या ३० राज्य संघटनांच्या संघाचा सहभाग असेल. स्पर्धेतील सर्व सामने नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद मैदानावर पार पडतील.
दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्राने केले असून, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिस सह-आयोजक असतील. स्पर्धेचा अंतिम सामना २१ डिसेंबर रोजी होईल.
या वेळी राष्ट्रीय स्पर्धा नव्या पद्धतीने घेण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला असून, केवळ राज्य संघटनांचेच संघ स्पर्धेत सहभागी होतील. यापूर्वी संलंग्न असणाऱ्या संस्थानाही राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळत होता. त्यामुळ स्पर्धा एकत्र व्हायची आणि त्यानंतर स्पर्धा दोन टप्प्यात (विभाग अ आणि विभाग ब) घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हॉकी महाराष्ट्राचे सहयोगी उपाध्यक्ष आणि संयोजन समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा प्रकाश (आयपीएस) म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या खेळाचा मला एक भाग होता आले आणि छोटीशी जबाबदारी सांभाळायला मिळाली हा मी माझा गौरव मानतो. एक खेळाडू म्हणून हॉकी महाराष्ट्राने माझ्यावर जी जबाबदारी दिल्यामुळे मला मोकळ्या मनाने भारतातील सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या हॉकी खेळाशी जोडता आले. ज्या प्रमाणे माझे संपुर्ण पोलिस दल सैदव माझ्या पाठिशी उभे रहाते, त्या प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने आम्हाला सहकार्य करण्याचे निश्चित केल्यामुळे मी हॉकी महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे आभार मानतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्याबरोबर असलेल्या सर्व सहयोगी भागीदारींनाही या वेळी विसरता येणार नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला हे आव्हान पेलता आले. या स्पर्धेला सर्वोत्तम बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या साठी सामने पाहायला चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे मी आवाहन करतो.’
या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकने सर्व सर्वोत्तम सुविधांनी सज्ज हॉकी स्टेडियम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि संयोजन समितीचे आधारस्तंभ राजेश पाटिल (आयएएस) म्हणाले, ‘ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना देशाची मान कायमच उंचावणारे अनेक स्टार खेळाडू या खेळाने आपल्याला दिले; अशा सर्वोत्तम खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करायला मिळणे हे आमचे भाग्यच आहे. शहरात हॉकीला प्रोत्साहन देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नेहमीच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला सर्वोत्तम सुविधा पुरवताना मागे पुढे पाहिले नाही. जेव्हा आमच्याकडे या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने तातडीने मंजुरी दिली. अलिकडेच आम्ही या मैदानाचे नूतनीकरण केले असून, तेथे अत्यधुनिक दर्जाचे ब्ल्यु टर्फ बसवले असून, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. आगामी काळात येथील जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्यापद्धतीने कामही सुरू केले आहे.’
हॉकी महाराष्ट्र दहाव्यांदा राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करत आहे. या आतापर्यंतच्या आयोजनात तिसऱ्यांदा हॉकी महाराष्ट्र वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी पुण्यात २०१३ मध्ये तिसऱ्या आणि २०१५ मध्ये पाचव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनीष आनंद म्हणाले, ‘राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यासाठी हॉकी महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतला आहे. हॉकीवर भरभरून प्रेम करणारे चाहते असल्यामुळे आम्हाला अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळते.’
स्पर्धेतील सामने प्रथम साखळी आणि नंतर बाद फेरी पद्धतीने होणार आहेत. सहभागी ३० संघांना आठ गटात विभागण्यात आले आहे. अ आणि ब गटात प्रत्येकी ३, तर अन्य सर्व गटात ४ संघांचा सहभाग असेल. गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० सामने होणार आहेत.
हॉकी महाराष्ट्राचे मानद सचिव आणि संयोजन सचिव मनोज भोरे म्हणाले, ‘या वर्षीपासून हॉकी इंडियाने राज्यातील संस्थांना वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या स्पर्धे केवळ राज्य संघांचाच राहणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढणार आहे. त्याचबरोबर फक्त राज्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे.’
गेल्या दशकभरात हॉकी महाराष्ट्राने दहा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. हॉकी महाराष्ट्रासाठी ही बाब अभिमानास्पद अशीच आहे. अखेरच्या राष्ट्रीय स्पर्धेचे महाराष्ट्रातील आयोजन २०१३ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्येच करण्यात आले होते. तेव्हा म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावरही सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते, असेही भोरे यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी सहयोगी भागीदार म्हणून अभिनव बिंद्रा टार्गेटिंग परफॉर्मन्स (एबीटीपी), डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (वैद्यकीय सेवा), युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी (सुरक्षा व्यवस्था), बीव्हीजी (हाऊसकिपिंग सुविधा) हे स्पर्धेबरोबर राहणार आहेत.
येथे पाहा वेळापत्रक-
11th Senior Men Nationals, Groups & Schedule
महत्त्वाच्या बातम्या-
इतकं कोण करतं ना? विराटचं कौतुक करावं तितकं कमीच, आरसीबीसाठी स्वत:च्या पगारात केली कपात
केवळ पैशासाठी नाते तोडून गेला राशिद? काय घडले सनरायझर्सच्या गोटात? वाचा सविस्तर
विराटने घेतली शपथ; म्हणाला, ‘आरसीबीसोबत पुढील ३ वर्षे घालवायची आहेत, अजून माझं बेस्ट देणं बाकी आहे’