फुटबॉल सम्राट पेले यांच्यानंतर सर्वाधिक प्रसिद्धी लाभलेल्या अर्जेंटिनाच्या माजी फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. फुटबॉल चाहत्यांसाठी ही एक दुःखद बातमी आहे. जगभरात आपल्या चमत्कारिक फुटबॉल कौशल्याने, करोडो चाहते कमावणाऱ्या मॅराडोना यांच्याबद्दलच्या १२ रंजक गोष्टी आपण जाणून घेऊया.
१) दिएगो अरमांडो मॅराडोना असे पूर्ण नाव असलेल्या मॅराडोना यांचा जन्म अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे ३० ऑक्टोबर १९६० रोजी झाला.
२) मॅराडोना यांनी ९१ आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्जेंटिना फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करताना ३४ गोल झळकावले होते.
३) मॅराडोना यांनी चार विश्वचषकात अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले. कर्णधार म्हणून फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा आहे. मॅराडोना यांनी १६ विश्वचषक सामन्यात अर्जेंटिनाचे नेतृत्व केले होते. १९७९ मध्ये युवा फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेंटिना संघातही त्यांचा समावेश होता.
४) मॅराडोना यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ब्युनस आयर्स येथे हंगेरी विरुद्ध त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळलेला.
५) १९८२ फुटबॉल विश्वचषकातील एकाच सामन्यात सर्वाधिक २३ फाऊल करण्याचा नकोसा विक्रम त्यांच्या नावे जमा आहे. इटली विरुद्धच्या सामन्यात त्यांनी हे विक्रमी फाऊल केले होते. १९८६ विश्वचषकात देखील त्यांनी ५३ फाऊल केलेले.
६) मेक्सिको येथे झालेल्या १९८६ फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेंटिना संघाचे ते कर्णधार होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला देण्यात येणारा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मॅराडोना यांनी आपल्या नावे केला होता.
७) १९८६ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी केलेला विवादित गोल ‘हॅण्ड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. हा गोल मॅराडोना यांच्या हाताला लागून झाला होता. या गोलमुळे अर्जेंटिना संघ इंग्लंड विरुद्धचा हा सामना २-१ अशा फरकाने जिंकण्यात यशस्वी झाला.
८) मॅराडोना हे १९९४ फुटबॉल विश्वचषकावेळी उत्तेजक द्रव्ये घेतल्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यामुळे, २ सामन्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात आले.
९) निवृत्तीनंतर त्यांनी २००८ मध्ये अर्जेंटिना फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ अत्यंत निराशाजनक राहिला. २०१० फुटबॉल विश्वचषकात जर्मनीच्या हातून उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
१०) मॅराडोना कायम आपल्या विवादित वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले होते. २००६ फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनासाठी ते आमंत्रण असूनही उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले होते की, मला त्या पेलेसोबत बसायचे नाही.
११) मॅराडोना हे क्युबन क्रांतिकारक राऊल कॅस्ट्रो यांंचे घनिष्ठ मित्र होते. मॅराडोना यांनी आपल्या दंडावर क्रांतिकारकचे गिवेराचा व डाव्या मांडीवर क्युबन क्रांतीचा जनक फिडेल कॅस्ट्रो यांचे टॅटू गोंदवून घेतले होते.
१२) मॅराडोना २०१७ मध्ये भारत भेटीवर आले होते. या भेटीदरम्यान ते माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली याच्यासोबत एक प्रदर्शनीय फुटबॉल सामना खेळणार होते. मात्र, काही कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आला होता.
वाचा-
कहाणी मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ ची…
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या कारकिर्दीवर एक नजर…
ब्रेंकिंग ! महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन