राजकारण आणि क्रिकेट यांचा भारतामध्ये खूपच जवळचा संबंध आहे. भारतातील अनेक राज्य क्रिकेट संघटनांमध्ये राजकारण्यांचे वर्चस्व असलेले दिसून येते. त्याचप्रमाणे, शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे देखील अध्यक्षपद भूषवले आहे.
महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. शिवसेनेने अनेक वेळा भारत-पाकिस्तान वादादरम्यान क्रिकेटच्या माध्यमातून पाकिस्तानला काही मदत होणार नाही याची पुरेपूर दखल घेतली. यातील काही निवडक घटनांचा आपण आढावा घेऊया.
१) वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी खोदली.
१९९१ मध्ये पाकिस्तान भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा मुंबई येथे होणा-या पहिल्या कसोटी सामन्याआधी शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियम वरील खेळपट्टी खोदली. या प्रकारानंतर ती संपूर्ण मालिका रद्द करण्यात आली.
२) मुंबई येथे होऊ शकणारी कसोटी रद्द केली.
१९९८ मध्ये महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे सरकार होते. जानेवारी १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान एक कसोटी मुंबई येथे होण्याची शक्यता होती. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ती कसोटी रद्द केली.
३) फिरोजशहा कोटला मैदानाची खेळपट्टी उखडली.
मुंबई कसोटी रद्द केल्यानंतर ती कसोटी दिल्ली येथे हलविण्यात आली. परंतु, शिवसेनेने त्याला देखील विरोध केला. फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडण्यात आली. त्यानंतर मैदानात विषारी साप देखील सोडण्याची धमकी दिली गेली आणि त्यापासून बचावासाठी दिल्ली क्रिकेट संघटनेने जवळपास ४० सर्पमित्र मैदानावर कार्यरत केले होते. ही कसोटी अनिल कुंबळेच्या एका डावातील दहा बळी घेण्यासाठी ओळखली जाते. कुंबळेने दुसऱ्या डावात पाकिस्तानचे सर्वच्या सर्व दहा बळी आपल्या नावे केले होते.
४) १९८३ च्या विश्वचषकाच्या ट्रॉफीचे नुकसान.
१९९९ च्या भारत-पाकिस्तान मालिकेला विरोध करण्यासाठी शिवसेनेने बीसीसीआयच्या मुंबईस्थित कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी काही शिवसैनिक आत मध्ये घुसले. त्यावेळी, काही निदर्शकांच्या हातून चुकून १९८३ च्या विश्वचषकाची ट्रॉफी चेपली गेली.
५) आग्रा येथील खेळपट्टीचे नुकसान.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील माजी दिग्गजांचा एक सामन्यामध्ये आग्र्याच्या आग्रा स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार होता. त्या सामन्याला विरोध म्हणून आग्र्यातील काही शिवसैनिकांनी खेळपट्टीचे नुकसान केले होते.
६) २००५ चा पाकिस्तानचा भारत दौरा न होऊ देण्याची शपथ.
२००५ साली पाकिस्तान भारत दौऱ्यावर येणार होता. परंतु, शिवसेनेच्या अनेक शिवसैनिकांनी अशी शपथ घेतली होती कि, पाकिस्तानला संपूर्ण भारतात कोठेच खेळू देणार नाही.
७) भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान निदर्शने.
२००५ साली पाकिस्तान संघ भारतीय दौऱ्यावर आला असता, दिल्ली येथील एकदिवसीय सामन्यावेळी भारतीय विद्यार्थी सेना, जी शिवसेनेची एक विद्यार्थी शाखा आहे. त्यांनी त्या सामन्यावेळी स्टेडियम बाहेर निदर्शने केली होती.
८) २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी पाकिस्तानच्या सामन्यात अडथळे.
जुलै २००६ मध्ये, मुंबईच्या लोकलमधील साखळी बॉंबस्फोटांच्या मालिकेत पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याने शिवसेनेने पाकिस्तानला भारतात खेळवण्यास विरोध केला होता. मोहाली व जयपूर येथील पाकिस्तानच्या सामन्यांवेळी निदर्शने केली गेली.
९) २००९ मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी.
शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी, आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात पाकिस्तानी खेळाडूंना खेळवू नये अशी मागणी केली. २००८ सालच्या मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याने त्यांनी ही मागणी केली होती. त्यानंतर, पुढे कधीही पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसले नाहीत.
१०) शाहरुख खानला लक्ष केले.
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळवावे. अशी मागणी अभिनेता शाहरुख खान याने केली होती. याला विरोध म्हणून शिवसेनेने शाहरुख खान विरुद्ध निदर्शने केली सोबतच त्याच्या माय नेम इज खान या चित्रपटावर बहिष्कार टाकला होता.
११) २०११ विश्वचषक अंतिम सामना.
पाकिस्तानच्या संघाने जर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर, त्यांना मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित अंतिम सामन्यात खेळू दिले जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती. पाकिस्तान उपांत्य सामन्यात भारताकडून हरल्याने ही वेळ आली नाही.
१२) २०१२ च्या दौऱ्याला विरोध
२०१२ साली पाकिस्तानी संघ एका छोट्या दौऱ्यासाठी भारतात आला होता. परंतु, पाकिस्तानचा कोणताच सामना मुंबईत आयोजित करायचा नाही, अशी धमकी शिवसेनेने दिली होती. पुढे, काही वाद नको म्हणून बीसीसीआयने त्या दौऱ्यातील एकही सामना मुंबईत घेतला नाही.
१३) बैठकीला विरोध
१५ ऑक्टोबर २०१५ रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान हे बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांची मुंबई येथे पुढील विपक्ष मालिकेसाठी भेट घेणार होते. काही शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढून ती बैठक रद्द करण्यास सांगितले. पुढे ही बैठक दिल्ली येथे पार पडली.