मॅंचेस्टरमध्ये भारताविरुद्ध (IND vs ENG) सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने टीम इंडियावर वर्चस्व गाजवलं, तर त्यामागे मोठं कारण होतं कर्णधार बेन स्टोक्सची (Ben Stocks) शानदार शतकाची खेळी. स्टोक्सने 141 धावा करत आपल्या कारकिर्दीतील 14वं कसोटी शतक झळकावलं आणि त्याचबरोबर अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. पण त्याहून मोठा होता तो म्हणजे ऐतिहासिक कामगिरीचा क्षण, ज्यामुळे तो कसोटी क्रिकेटच्या जवळपास 148 वर्षांच्या इतिहासातील फक्त तिसरा खेळाडू ठरला.
हा विक्रम स्पष्टपणे सांगतो की, बेन स्टोक्स हा केवळ चांगला फलंदाज नाही, तर एक असा ऑलराउंडर आहे जो गोलंदाजीनेसुद्धा सामना जिंकवण्याची ताकद ठेवतो आणि म्हणूनच तो या आधुनिक युगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो.
मॅंचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टोक्सने एक जबरदस्त षटकार मारताच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7,000 धावा पूर्ण झाल्या आणि जेव्हा या धावांसोबत त्याच्या नावावर 229 विकेट्सही झाल्या, तेव्हा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात किमान 7,000 धावा आणि 200 विकेट्स असलेला ‘डबल’ पूर्ण करणारा फक्त तिसरा खेळाडू ठरला. तसेच हा इतिहास जवळपास 148 वर्षांचा आहे.
या दुर्मिळ विक्रमाच्या यादीत पहिलं नाव येतं दक्षिण आफ्रिकेच्या महान ऑलराउंडर जॅक्स कॅलिसचं, ज्याच्या नावावर 13,289 धावा आणि 292 विकेट्स आहेत. दुसऱ्या स्थानावर आहेत वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गॅरी सोबर्स. ज्यांनी 8032 धावा केल्या आणि 235 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता या दोघांनंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स. ही एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी आहे.






