क्रिकेट खेळताना जर सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर खेळाडूच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला आहे. येथे क्रिकेट खेळताना 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना केरळमधील कोट्टाक्कल शहरात घडली. या मुलीचं नाव तपस्या असून ती मूळची महाराष्ट्राची रहिवासी आहे. क्रिकेटच्या सरावाच्या वेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु कालांतरानं तिची प्रकृती अधिकच खालावली. यानंतर तपस्याच्या कुटुंबीयांनी तिला महाराष्ट्रातील रुग्णालयात हलवलं. मात्र डोक्याला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे बुधवारी (30 ऑक्टोबर) तिचा मृत्यू झाला.
तपस्याच्या वडिलांचं नाव परशुराम सेठ असून ते सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करतात. तपस्या ही दहावीची विद्यार्थिनी होती, जी तिच्या शाळेतील मित्रांसोबत हेल्मेट न घालता क्रिकेटचा सराव करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, गोलंदाज जेव्हा चेंडू टाकण्यासाठी धाव घेत होता, तेव्हा तपस्याचं लक्ष खेळपट्टीवर पडलेल्या एका गोष्टीकडे गेलं. अशा परिस्थितीत या 15 वर्षीय मुलीनं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा बॅटशी संपर्क झाला नाही आणि तो सरळ तिच्या डोक्यावर आदळला.
डोक्याला चेंडू लागल्यानंतर तपस्या लगेचच जमिनीवर पडली. महाराष्ट्रातील रुग्णालयात हलवल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिचं कुटुंब अनेक वर्षांपासून केरळच्या मलप्पुरम शहरातील मेलमुरी भागात राहत होतं.
क्रिकेटचा चेंडू खूप कठीण असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही फलंदाज मैदानावर खेळण्यासाठी पूर्ण सुरक्षिततेनं येतात. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशीच घटना घडली होती. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू फिल ह्यूज याचा क्रिकेटचा चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
हेही वाचा –
हेड कोच गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या! फसवणूक प्रकरणी नव्यानं तपास होणार
विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी
19 वर्षांपूर्वी बनला होता विश्वविक्रम! लांब केसांच्या ‘माही’नं आजच्याच दिवशी खेळली होती कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी