सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू असून आज (१० जानेवारी) या लढतीचा चौथा दिवस होता. ऑस्ट्रेलियाने २ बाद १०५ धावांपासून पुढे दिवसाचा खेळ सुरु केला आणि दमदार फलंदाजी करत ३१२ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीसर भारताला ४०७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारताकडून दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीसाठी शुबमन गिल आणि रोहित शर्मा उतरले. या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करुन देत अर्धशतकी भागीदारी केली. याबरोबरच त्यांनी एक खास कामगिरी केली आहे.
या दोघांनी २३ षटके फलंदाजी करताना ७१ धावांची भागिदारी रचली. त्यामुळे जवळपास १५ वर्षांनंतर घरच्या किंवा परदेशातील मैदानावर भारतीय सलामी जोडीने कसोटी सामन्यातील दोन्ही डावात प्रत्येकी पहिली २० किंवा त्यापेक्षा जास्त षटके बिनबाद खेळण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी या सामन्यातील पहिल्या डावातही २७ षटके फलंदाजी करताना ७० धावांची भागीदारी रचली होती.
त्यांच्याआधी गेल्या १५ वर्षात घरच्या किंवा बाहेरच्या मैदानावर खेळताना प्रत्येकवेळी किमान एकतरी सलामीवीर कसोटी सामन्याच्या एकातरी डावात २० षटकांच्या आत बाद होत होता. अखेर रोहित आणि गिलने २३ षटके फलंदाजी करत या नकोशा कामगिरीला खंड पाडला.
यापुर्वी बेंगळुरू येथे मार्च २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी सलामीला २० पेक्षा अधिक षटके नाबाद खेळली होती.
यावेळी पहिल्या डावात २३.२ षटकात त्यांनी ९८ धावांची भागिदारी रचली होती. अखेर पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद सामीने युनूस खानच्या हातून गंभीरला २४ धावांवर झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली होती. तर दुसऱ्या डावात या सलामीवीरांनी मिळून २३.४ षटकापर्यंत ८७ धावा केल्या होत्या. शेवटी अब्दुल रझाकने ३८ धावांवर सेहवागला धावबाद केल्याने दुसऱ्यांदा त्यांची शतकी भागिदारी हुकली होती.
आशिया खंडाबाहेर १० वर्षांनंतर केली खास कामगिरी
याव्यतिरिक्त सिडनीत चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही रोहित-गिलने खास विक्रम केला होती. या दोघांनी पहिल्या डावात २७ षटके फलंदाजी करताना ७० धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे तब्बल १० वर्षांनंतर आणि ९२ कसोटी डावांनंतर आशिया खंडाबाहेर भारतीय सलामी जोडीने डावाची पहिली २० किंवा त्यापेक्षा अधिक षटके बाद न होता खेळण्याची कामगिरी केली.
योगायोगाने सेहवाग आणि गंभीर या सलामी जोडीनेच यापुर्वी आशिया खंडाबाहेर २०पेक्षा जास्त षटके बिनबाद खेळण्याची कामगिरी केली होती. सेंच्यूरियन येथे डिसेंबर २०१० ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्यांनी सलामीला २९.३ षटके बाद न होता फलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी बाद न होता खेळली २० षटके
IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट






