क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहतात. हे दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया स्पर्धांमध्ये समोरा-समोर येतात. क्रिकेटविश्वात पुरूष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ सुरू होणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून भारत आणि श्रीलंकेत याचे सामने आयोजित केले आहेत. यामध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी १५ फेब्रुवारीला खेळला जाणार होता. पाकिस्तानने मात्र यावर बहिष्कार आणला आहे. तरीही १५ फेब्रुवारीला हे दोन्ही संघ समोरा-समोर येणार हे मात्र नक्की आहे. ते आणि कसे, जाणून घेऊ.
पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या सरकारच्या मंजुरीनंतर भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषक २०२६चा सामना खेळण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता भारत आणि पाकिस्तान महिला संघही त्याच दिवशी एकमेकासमोर येणार असून हा सामना मात्र खेळण्याचे निश्चित आहे.
हे दोन्ही संघ रायजिंग स्टार्स एशिया कप २०२६ या स्पर्धेत खेळणार आहेत. यामध्ये १५ फेब्रुवारीला इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए महिला संघ भिडणार आहेत. हा सामना बॅंकॉकमध्ये खेळला जाणार आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार आणल्यानंतर महिला संघ जाहीर केला. तसेच त्यांनी महिला संघाच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे कोणतेही विधान केलेले नाही.
पाकिस्तानच्या बहिष्कारच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) त्यांना अधिक विचार करण्यास सांगितले आहे. याबाबत आयसीसीने म्हटले, “आयसीसी पीसीबीच्या सुधारित निर्णयाची वाट पाहणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक ठरले असून पाकिस्तानने असे करणे हे चाहत्यांच्या, खेळाच्या हिताचे नाही.”
विशेष म्हणजे आयसीसीच्या १९ वर्षाखालील स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकाविरोधात खेळले होते. तसेच टी२० विश्वचषकाचा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी या सामन्यावर का बहिष्कार टाकला हे त्यांनाच माहित. या स्पर्धेतून बांग्लादेशने आधीच माघार घेतली असून त्यांच्याजागी स्कॉटलंड खेळणार आहे. तसेच बांग्लादेशला समर्थन करण्यासाठी पाकिस्तानने केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी त्यांनी स्पर्धेतूून माघार घेण्याचे ठरवले होते, आता मात्र भारताविरुद्ध खेळणार नाही असा निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेत पाकिस्तान सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.






