पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे 8 ते 15डिसेंबर 2018 येथे रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आणि एनइसीसी महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री यांनी सांगितले कि, या स्पर्धेत 25देशांतील अव्वल महिला टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेला नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
एकाच प्रायोजकाचा पाठिंबा लाभलेली आणि सर्वाधिक कालावधीसाठी सुरु असलेली जगातील एकमेव आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे आणि त्यामुळे या स्पर्धेला पाठिंबा देऊन भारतांतील महिला टेनिस विश्वात एक नवा मानबिंदू प्रस्थापित करण्यास आम्हांला आनंद होत असल्याचे एनइसीसी महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री यांनी नमूद केले.
2001पासून हि स्पर्धा सुरु असून त्यावेळी या स्पर्धेची पारितोषिकाची रक्कम 10,000डॉलर होती. परंतु 2006-2008मध्ये या स्पर्धेच्या पारितोषिकाची रक्कम वाढविण्यात आली व ती 25,000डॉलर करण्यात आली. 2009मध्ये या स्पर्धेला 10वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 50,000डॉलर करण्यात आली आणि 2010पासून या स्पर्धेची रक्कम 25,000डॉलर करण्यात आली असल्याचे गिरमे यांनी सांगितले.
तसेच, या स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावलेल्या आर्याना सबलेंका, बोजाना जोवनोवस्की, मागदा लिनेटी, कॅतीरायना बोन्डारेनको या खेळाडूंनी डब्ल्यूटीए टूरमध्ये अव्वल 20खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त केले आहे. झील देसाई, भुवना कुलवा, राष्ट्रीय महिला विजेती महक जैन आणि स्नेहल माने यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असल्याचे गिरमे यांनी सांगितले.
आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची आयटीएफ महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार व रविवार या दिवशी होणार असून मुख्य फेरीस सोमवार दि. 10 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे
जिया-जिंग लू(चीन), डेनीज खजानीयुक(इस्राईल), या सुआन ली(तैपेई), कॅटरझायना पीटर(पोलंड), जुनरी नमिगता(जपान), कॅटरझायना कावा(पोलंड), डायना मर्सीकेविचा(लातविया), व्हॅलेरिया स्ट्राकोवा(युक्रेन).