भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर बांगलादेशची फलंदाजी गडगडली!

इंदोर। आजपासून(14 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना(1st Test) सुरु झाला आहे. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला आहे.

बांगलादेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना याचा फायदा घेता आला नाही. बांगलादेशने पहिल्या 3 विकेट्स केवळ 31 धावांवर गमावल्या.

त्यानंतर मात्र कर्णधार मोमिनुल हक आणि मुश्फिकुर रहिमने बांगलादेशचा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. पण आर अश्विनने मोमिनुलला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

बांगलादेशकडून मोमिनुल(37) आणि रहिम(43) व्यतिरिक्त केवळ मोहम्मद मिथून(13), लिटन दास(21) आणि महमुद्दुलाह(10) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

You might also like