बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर (शुक्रवारी, 3 आॅगस्ट) भारताने 5 बाद 110 धावा केल्या अाहेत.
विजयासाठी भारताला अजून 84 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघाना विजयाची समान संधी आहे.
इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले आहे.पण या धावांचा पाठलाग करताना भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली.
भारताने सुरुवातीलाच सलामीवीर फलंदाज मुरली विजय(6) आणि शिखर धवनची(13) विकेट लवकर गमावली. या दोघांनाही स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. विजयला सुरुवातीलाच डेव्हिड मलानने झेल सोडल्याने जीवदान मिळाले होते. पण त्याला त्याचा फायदा घेता आला नाही.
त्यामुळे पहिल्या डावाप्रमाणे पुन्हा एकदा भारताचा हा डाव संभाळण्याची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीवर आली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ देण्यास केएल राहुल(13) आणि अजिंक्य रहाणेला(2) अपयश आले.
रहाणे आणि राहुल बाद झाल्यानंतर नाइटवॉचमॅन म्हणून आर अश्विन फलंदाजीसाठी आला होता. त्याने विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने अश्विनला 13 धावांवर बाद केले.
त्यामुळे दिनेश कार्तिकला मैदानात यावे लागले. नंतर कार्तिक आणि विराटने तिसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही षटकात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
तिसऱ्या दिवसाखेर या दोघांनी नाबाद 32 धावांची भागीदारी केली आहे. विराट 43 धावांवर आणि कार्तिक 18 धावांवर नाबाद खेळत आहेत.
इंग्लंडकडून ब्रॉडने 29 धावात 2 विकेट घेतल्या आहेत. तसेच अन्य गोलंदाजांपैकी जेम्स अँडरसन, सॅम करन आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी इंग्लंडने तिसऱ्या दिवशी 1 बाद 9 धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पण सलामीवीर फलंदाज केटन जेनिंग्ज(8) आणि कर्णधार जो रुट(14) दिवसाच्या सुरुवातीलाच बाद झाल्याने इंग्लंडवरचा दबाव वाढला.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने इंग्लंडवरील हा दबाव कायम ठेवताना डेव्हिड मलान(20), जॉनी बेअरस्टो(28), बेन स्टोक्स(6) आणि जॉस बटलर(1) या मधल्या फळीतील फलंदाजांना झटपट बाद केले. यामुळे इंग्लंडची अवस्था 31 षटकात 7 बाद 87 धावा अशी झाली.
पण त्यानंतर सॅम करन या युवा अष्टपैलू खेळाडूने अदिल रशीदला साथीला घेत 48 धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. ही जोडी फोडण्यात उमेश यादवला यश आले त्याने रशीदला 16 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.
पण त्यानंतरही करनने एक बाजू संभाळत स्टुअर्ट ब्रॉडसोबत 41 धावांची भागीदारी रचत अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 65 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा केल्या. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 180 धावांचा टप्पा गाठला.
भारताकडून या डावात इशांत शर्माने 51 धावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर बाकी गोलंदाजांपैकी आर अश्विनने 59 धावात 3 आणि उमेश यादवने 20 धावात 2 विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 287 धावा
भारत पहिला डाव: सर्वबाद 274 धावा
इंग्लंड दुसरा डाव: सर्वबाद 180 धावा
भारत दुसरा डाव: 5 बाद 110 धावा
(विराट कोहली(43*) आणि दिनेश कार्तिक(18*) नाबाद खेळत आहेत.)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं
–उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी!
–पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात