डार्विन येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यात सर्वांना चकित करणारा निकाल पाहायला मिळाला. हा सामना बांगलादेशने 9 विकेट्सने जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामुळे दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया धमाकेदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती आणि घडलेही तसेच. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या मानहानीचा चांगलाच बदल घेतला आहे.
रविवारी (23 ऑगस्ट) मॅके येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा एक डाव आणि 51 धावांनी मोठा पराभव केला. या सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांतच लागला आहे.
शनिवारी (22 ऑगस्ट) सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा धमाका दिसला. त्याने 10 षटकांत 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रभावी गोलंदाजीमुळे बांगलादेशचा पहिला डाव 64 धावसंख्येवर संपुष्टात आला.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 210 धावा केल्या. बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही स्टार्कने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने 4 विकेट्स घेतल्या आणि बांगलादेशचा दुसरा डाव 95 धावसंख्येवर आटोपला.






