साधारणत: क्रिकेटचे बरेच नियम आपणा सर्वांना माहित असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा देशांतर्गत क्रिकेट, नेहमी सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होते. त्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार जो निर्णय घेईल त्यानुसार सामन्याची सुरुवात होते. अमर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरणारा संघ सर्वबाद होईपर्यंत किंवा त्यांच्या कर्णधाराने डाव घोषित करण्यापर्यंत त्यांचा पहिला डाव खेळतो. त्यानंतर विरुद्ध संघाच्या डावाला सुरुवात होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र षटकांचे बंधन असते, त्यामुळे षटके संपली की डावही संपतो.
साधारणत: प्रथम फलंदाजी करणारा संघ विरुद्ध संघापुढे अधिकाधिक धावांचे लक्ष्य देण्याच्या उद्देशात असतो. परंतु, कधी-कधी खुप कमी धावांवर संघ सर्वबाद होतो आणि विरुद्ध संघ सहजपणे सामना जिंकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५० षटकांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांवर सर्वबाद होण्याचा नकोसा विश्वविक्रम झिम्बाब्वे आणि युएसए या संघांवर आहे. हे दोन्ही संघ फक्त ३५ धावांवर सर्वबाद झाले होते.
जर, अ दर्जाच्या सामन्यांविषयी {ज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांचाही समावेश होतो} बोलायचे झाले तर आतापर्यंत ७ वेळा संघ ३५पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झाले आहेत. यामध्येही ४ संघ २५ धावाही बनवू शकले नाहीत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २५पेक्षा कमी धावांवर सर्वबाद होण्याचा विक्रम सर्वप्रथम मिडलसेक्स संघाच्या नावावर नोंदला गेला आहे. १९७४मध्ये यॉर्कशायर संघाने त्यांना फक्त २३ धावांवर सर्वबाद केले होते. पुढे ३३ वर्षे तो विक्रम मिडलसेक्स संघाच्या नावावर कायम होता. पुढे २००७मध्ये १९ वर्षांखालील वेस्ट इंडिज संघाने मिडलसेक्स संघाचा विक्रम मोडला. तेव्हापासून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांवर सर्वबाद होण्याचा नकोसा विश्वविक्रम त्यांच्याच नावावर अबाधित आहे.
सहसदस्यसयी संघांविषयी पाहायचे झाले तर, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांवर सर्वबाद होण्याचा नकोसा विक्रम ओमान संघाच्या नावावर आहे. २०१९मध्ये स्कॉटलॅंडने ओमानला फक्त २४ धावांवर चित केले होते. भारतातील अ दर्जाच्या क्रिकेट संघांमध्ये हा नकोसा विक्रम सौराष्ट्र संघाच्या नावावर आहे. २०००मध्ये मुंबईविरुद्धच्या अ दर्जाच्या सामन्यात पूर्ण सौराष्ट्र संघ फक्त ३४ धावांवर सर्वबाद झाला होता. याव्यतिरिक्त २०१४मध्ये रेल्वे संघाविरुद्ध राजस्थान संघ फक्त ३५ धावांवर सर्वबाद झाला होता.
पण, या लेखात अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २० पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झालेल्या २ संघांचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात कोणते आहेत ते २ संघ – 2 Teams All Out Under 20 Runs In List A Cricket
सार्केन्स स्पोर्ट्स क्लब {१९ धावा, विरुद्ध कोल्ट्स क्रिकेट क्लब}
१३ डिसेंबर २०१२ रोजी कोलंबो येथे प्रिमियर लिमिटेड ओव्हर टूर्नामेंटमधील कोल्ट क्रिकेट क्लब विरुद्ध सार्केन्स स्पोर्ट्स क्लब संघातील सामना पार पडला होता. या सामन्यात सार्केन्स स्पोर्ट्स क्लबचा पूर्ण संघ १०.५ षटकात फक्त १९ धावांवर सर्वबाद झाला होता. कोल्ट्स क्रिकेट क्लबच्या चतुरंगा कुमाराने ७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर, कनिष्का अलवीतिगालाने ११ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले होते.
सार्केन्स क्रिकेट क्लब संघातील एकही फलंदाज २ आकडी धावा करु शकला नव्हता आणि त्यांचे ५ फलंदाज शून्यावर बाद झाले होते. कोल्ट्स क्रिकेट क्लबने २.२ षटकात एकही विकेट न गमावता तो सामना जिंकला होता.
१९ वर्षांखालील वेस्ट इंडिज संघ {१८ धावा, विरुद्ध बार्बाडोस}
१९ वर्षांखालील वेस्ट इंडिज संघाच्या नावावर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांवर सर्वबाद होण्याच्या नकोशा विश्वविक्रमाची नोेंद आहे. १७ ऑक्टोबर २००७ला १९ वर्षांखालील वेस्ट इंडिज विरुद्ध बार्बाडोस संघामध्ये सामना पार पडला होता. यावेळी १९ वर्षांखालील वेस्ट इंडिज १४.३ षटकात फक्त १८ धावांवर सर्वबाद झाला होता. बार्बाडोस संघातील पेड्रो कॉलिंसने ११ धावा देत ७ विकेट्स चटकावल्या होत्या. तर, फिडेल एडवर्डने २ आणि ड्वेन स्मिथने १ विकेट घेतली होती.
१९ वर्षांखालील वेस्ट इंडिज संघातील ७ फलंदाज शून्यावर बाद झाले होते. तर, उर्वरित ३ फलंदाजांना २ आकडी धावा करता आल्या नव्हत्या. बार्बाडोस संघाने ५.५ षटकात २ विकेट्स गमावत सामना खिशात घातला होता.
ट्रेंडिंग लेख –
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…
रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानला एकेवेळी रडवणार क्रिकेटर झाला हिरो, करतोय तामिळ चित्रपटात पोलीसाचा रोल
रैना- धोनीमध्ये कर्णधार विराट कोहली या खेळाडूला देणार नाही टीम इंडियात संधी
पावसामुळे इंग्लंडचा विजय लांबणीवर; पहा शेवटच्या दिवशी काय आहे पावसाचा अंदाज