आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयपीएलमधील सर्वच संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे नेहमीच आयपीएलमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळतात.
आयपीएलमध्ये आतापर्यंत बरेच सामने बरोबरीत सुटले आहेत. मग ते सामने सुपर ओव्हर पर्यंतही पोहोचले आहेत. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ११ सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. २००९ मधील आयपीएल सामन्यात पहिला सुपर ओव्हर सामना झाला. आयपीएलमधील पहिला सुपर ओव्हर सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यात झाला आणि तेव्हापासून जवळपास प्रत्येक मोसमात सुपर ओव्हरमध्ये एखाद्या सामन्याचा तरी निकाल लागलेला दिसतो.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात आत्तापर्यंत ११ सामने खेळवण्यात आले, त्यातीलही दोन सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. यातील पहिला सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलमध्ये तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला.
आरसीबी संघाने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात ३ सुपर ओव्हर सामने खेळले आहेत. त्यातील २ सामने जिकंले. या लेखात आपण आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये जिंकलेल्या २ सामान्यांबद्दल जाणून घेऊ.
आयपीएलमध्ये आरसीबीने सुपर ओव्हर मध्ये जिंकलेले २ सामने
२. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स – २०१३
आयपीएलच्या सहाव्या सत्रात आरसीबी आणि दिल्ली डेअरडेव्हिल्समधील सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला होता. दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध १५३ धावांच्या पाठलाग करताना विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने तिसर्या विकेटसाठी १०३ धावांची जबरदस्त भागीदारी केली होती. विराट कोहलीने ६५ आणि एबी डिव्हिलियर्सने ३९ धावा केल्या होत्या.
आरसीबी संघ एका वेळी २ बाद १२९ धावांवर चांगली स्थितीत होता, परंतु नंतरच्या १७ चेंडूत ५ गडी गमावले आणि संघाची १३८/७ अशी अवस्था झाली. पण नंतर रवि रामपॉल आणि विनय कुमार यांनी अखेरच्या षटकात ११ धावा करून सामना बरोबरीत सोडला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करत बिनबाद १५ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्ली संघ २ गडी गमावून फक्त ११ धावा करू शकला. आरसीबीकडून रवि रामपॉलने सुपर ओव्हरमध्ये २ बळी मिळवून आरसीबीला विजय मिळवून दिला.
१. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – २०२०
आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आणखी एक सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०१/३ धावा केल्या. एबी डिव्हिलियर्सने २४ चेंडूत ५५ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सनेही २०१/५ धावा केल्या.
यात मुंबईकडून ईशान किशनने ५८ चेंडूत ९ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ९९ धावांची वादळी खेळी केली, पण जेव्हा संघाला २ चेंडूंमध्ये ५ धावांची गरज होती तेव्हा तो बाद झाला. त्याच वेळी, किरोन पोलार्डने २४ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६० धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने शेवटच्या चेंडूवर मुंबईला ५ धावांची गरज असताना पोलार्डला चौकार मारून सामना बरोबरीत सोडवण्यात यश आले. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हर मध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत १ गडी गमावून अवघ्या ७ धावा केल्या, ज्याला उत्तर म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर एकही गडी न गमावता सामना जिंकला.