fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

१६ वर्षांपुर्वी कबड्डी विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बक्षिसाचे मिळाले होते २ लाख रुपये

भारतात क्रिकेट पाठोपाठ कबड्डी हा खेळ सध्या लोकप्रिय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्येही भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

आत्तापर्यंत झालेल्या 3 कबड्डी विश्वचषकातही भारतीय संघच विजेता राहिला आहे. कबड्डीच्या विश्वचषकाला 2004 साली सुरवात झाली होती. हा पहिला विश्वचषकही भारताने जिंकला होता. या विश्वविजेत्या भारतीय संघाचा हा फोटो आहे.

संपुर्ण सामन्यात भारताचेच वर्चस्व-

आत्तापर्यंत कबड्डीमध्ये भारत आणि इराण यासंघात नेहमीच कडवी लढत झाली आहे. 2004 च्या पहिल्या विश्वचषकातही भारताचा अंतिम सामना इराण विरुद्धच झाला होता.

या सामन्यात भारताने मध्यंतरापर्यंत 27-12 अशी आघाडी मिळवली होती आणि नंतर हा सामना भारताने 55-27 अशा फरकाने जिंकून पहिले विश्वविजेतेपद मिळवले. यात भारताने इराणला 4 वेळा सर्वबाद केले होते आणि 11 बोनस गुणही मिळवले होते.

तब्बल ३ हजार प्रेक्षकांनी लावली होती हजेरी-

मुंबईत पार पडलेल्या या स्पर्धेसाठी 3,000 प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. तर इराणचे काही अधिकारी आणि खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यही भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे संघाला प्रोस्ताहन देण्यासाठी हजर होते.

महाराष्ट्राच्या खेळाडूला मिळाला होता सामनावीराचा पुरस्कार-

या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शैलेश सावंतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता, तर त्यावेळचा भारताचा कर्णधार संजीव कुमारला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. रेल्वेचाही कर्णधार असणाऱ्या संजीवने त्याच्या फुटवर्कने सर्वांना प्रभावित केले होते. याबरोबरच मनप्रीत लांबा, विकास या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली होती.

विजेत्यांना मिळाले होते २ लाख रुपये-

या विश्वविजेतेपदाचे बक्षीस म्हणून भारतीय संघाला 2 लाख रुपये देण्यात आले होते आणि उपविजेत्या इराणला 1.25 लाख रुपये बक्षीस देण्यात आले होते.

तब्बल १२ संघांनी घेतला होता भाग-

19 ते 21 नोव्हेंबर 2004 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारत, इराणसह एकूण 12 देशांचा समावेश होता. यात  बांग्लादेश, कॅनडा, जर्मनी,  भारत, इराण, जपान, मलेशिया, नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड, युनायटेड किंग्डम, वेस्ट इंडीज या 12 देशांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत भारत आणि इराण संघाला उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला होता. तसेच उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशला तर इराणने कॅनडाला पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते.

एकाच दिवशी बाद फेरी आणि अंतिम फेरीचे सामने-

विशेष म्हणजे या स्पर्धेतील बाद फेरीचे सर्व सामने आणि अंतिम सामना एकाच दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबरला खेळवण्यात आले होते.

भारत-इराणचा राहिला आहे दबदबा-

तसेच 2004 पासून झालेल्या तीनही विश्वचषकात अंतिम सामना भारत विरुद्ध इराण असाच झाला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव खेळाडू

-आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली

-ज्या अकाऊंटवरुन धोनीला ट्रोल करण्यात आले तीच पोस्ट केली रिषभ पंतने लाईक

You might also like