मागीलवर्षी डिसेंबरमध्ये आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचला विकत घेतले आहे.
त्यामुळे आरसीबी हा फिंचला संघात सामील करुन घेणारा आयपीएलमधील आत्तापर्यंतचा ८ वा संघ आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे.
फिंचने २०१० ला आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने २०१० ला राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०११ आणि २०१२ या दोन मोसमात फिंच दिल्ली डेअरडेविल्स (आत्ताचे नाव दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे.
२०१३ मध्ये तो पुणे वॉरियर्स इंडिया संघाशी जोडला गेला. २०१४ ला त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने विकत घेत संघात सामील केले. त्याच्या पुढच्यावर्षी मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केले. मात्र तो त्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून ३ सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने त्या मोसमातून बाहेर पडला होता.
२०१६ ला त्याला गुजराज लायन्सने संघात घेतले. तो गुजरातकडून २ मोसम खेळला. त्यानंतर २०१८ ला तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला. यानंतर २०१९ विश्वचषकाची तयारी करण्यासाठी २०१९ चा आयपीएल मोसम न खेळण्याचा निर्णय फिंचने घेतला होता.
पण २०२० च्या आयपीएलच्या मोसमासाठी त्याला आरसीबीने खरेदी केले आहे. मात्र सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पहाता आयपीएलच्या १३ व्या मोसमाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. तसेच सध्यातरी आयपीएलचा हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.