-पराग पुजारी
‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग आणि क्लेअर टेलर यांचा समावेश झाल्याची बातमी आज कळली. छान वाटलं. कसोटी आणि वनडेमधील या तिघांची कामगिरी पाहता तिघेही हा सन्मान डिझर्व्ह करतातच.
मग सहज उत्सुकता म्हणून हॉल ऑफ फेमचे आजपर्यंतचे मानकरी पाहिले. त्यातील बरीच नावे ही खरंच हकदार अशी, पण काही नावे खरंच आश्चर्यजनक होती की या अमुकतमुकने असं काय खास केलंय की ह्याला हॉल ऑफ फेम दिलाय, पण मग बाजूला त्यांचा देश पाहिला की फेव्हरिझम नावाची मेख लक्षात येते. हे असं करून आयसीसीने आयसिसपणा केलाय असं वाटतं.
या, असे इकडून लॉजिकच्या वाटेने या, जरा जाऊ खोलात आणि घेऊ घोळात या शिंच्या आयसीसीस. विषय असा आहे की आयसीसीकडून २००९ पासून हॉल ऑफ फेमने क्रिकेटपटूंना सन्मानित करण्याची सुरुवात झाली, आणि आजवर हा सन्मान ८७ खेळाडूंना मिळाला आहे. पूर्ण लिस्ट पाहून वाटलं की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी आपल्यासाठी एक वेगळं हॉल ऑफ फेम का सुरु करू नये? कारण एकूण ८७ पैकी ५३ जण या दोघांचेच आहेत – इंग्लंड २८, ऑस्ट्रेलिया २५.
आशियातील खेळाडूंवर, संघांवर अन्याय किंवा दुजाभाव म्हणू फार तर, पण तो होण्याचा प्रकार इथेही दिसून येतो. भारत, श्रीलंका, पाकिस्तान हे बरीच वर्षे क्रिकेटविश्वातले तीन मेजर जायन्ट्स राहिले आहेत. पण तिघांत मिळून हॉल ऑफ फेमची फक्त एक टीम होऊ दिली आहे आयसीसीने.. भारत ५, पाकिस्तान ५ आणि श्रीलंका १ असे हे ११ जण. बाकी वेस्ट इंडिज १८ (पूर्वपुण्याईवर), न्यूझीलंड ३ आणि दक्षिण आफ्रिका २ अशी आकडेवारी आहे.
खरेतर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्हीतले विश्वविक्रम आशियाई खेळाडूंच्या नावावर आहेत. संघ म्हणूनही यांनी अनेक मोठे चषक वारंवार जिंकले आहेत. जागतिक क्रिकेटचा दर्जा एकूणच आपल्या कामगिरीने यांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेला मेहनतीची आणि सातत्याची जोड देऊन सुधारला आहे. तरीही असे का? का? का?
इंग्लंडचे २८ खेळाडू जगात इतके बेस्ट आहेत तर इंग्लंडने किती विश्वचषक किंवा आयसीसी स्पर्धा आजवर जिंकल्या आहेत? आता समर्थन करायचंच झालं तर असं म्हणता येईल की प्राचीन काळात क्रिकेट जेव्हा २-३ संघांमध्येच खेळले जायचे, तेव्हाच्या बऱ्याच जुन्या खोडांना एक द्यायचा तसा सन्मान म्हणून या मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केलंय (हे स्पष्टपणे जाणवतं), आणि अर्थात त्या स्कीममधूनच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच खेळाडूंना लॉटरी लागली आहे.
पण एक लक्षात घेतले पाहिजे, आधुनिक क्रिकेट हे जास्त आव्हानात्मक आणि प्रचंड थकवणारे आहे, त्यामुळे हे सन्मान एकविसाव्या शतकात सुरु केलेत तर अलीकडे २०-३० वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंना यात आता तरी प्राधान्य मिळावे.. मिळते आहेही, नाही असं नाही. प्राचीन खेळाडूंना तसेही २००९-२०१० च्या लॉटमध्ये जास्तीत जास्त सामावून घेतलंय. इतर देशांच्या खेळाडूंपैकी माझ्या मते कॅलिस, पोलॉक, संगकारा अशा काही खेळाडूंना हा सन्मान लवकरच मिळायला हवा.
जाता जाता: भारताचे यात समावेश झालेले पाच खेळाडू म्हणजे बिशनसिंग बेदी, कपिलदेव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, आणि आता राहुल द्रविड.
काय मग, एक नाव प्रकर्षाने मिसिंग वाटतंय ना? मानकऱ्यांची निवड करणाऱ्यांनो, ‘देव’ सगळं बघत असतो हे लक्षात ठेवा. (निवृत्तीनंतर पाच वर्षांनी समावेशासाठी पात्र हा निकष आहे हॉल ऑफ फेमसाठी).. बाकी आता सहा दिवसांनी ज्याचा हॅपी बर्थडे आहे तोही यात आला तर भारी वाटेल, पण निकष वनडे आणि कसोटी या दोन्हीतील कामगिरी असल्यास (प्राचीन खेळाडू वगळता) ते जरा कठीण वाटतंय, त्यात तो आशियाई, त्यात बंगाली, त्यात इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर टीशर्ट काढलेला आणि वारंवार ऑसीजशीही पंगा घेत दादागिरी केलेला खेळाडू.. मग या दोन देशांची मक्तेदारी असलेल्या यादीत तो येणे जराss… (चला हे वाक्य इथेच सोडून देऊ)
असो.. ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम असं एक सेपरेट आहेच, तसं आपण आपलं भारतापुरतं किंवा मग आशियाई हॉल ऑफ फेम तरी सुरु करायला हरकत नाही. बघू, पुढचं पुढे. तूर्तास द्रविड, पॉन्टिंग आणि टेलरचे हार्दिक अभिनंदन.
महत्त्वाच्या बातम्या-
-कर्णधार कोहली म्हणतो, आम्हाला कमी समजणं इंग्लंडला महागात पडू शकत
-फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व…