डब्लिन | शुक्रवारी न्युझीलॅंड विरुद्ध आयर्लंड सामन्यात न्युझीलॅंडच्या महिलांनी ५० षटकांत चक्क ४ बाद ४९० धावा केल्या. तसेच आयर्लंडच्या महिला संघावर तब्बल ३४६ धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकत या सामन्यात न्युझीलॅंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा योग्य निर्णय ठरवत सुझी बेट्सने ९४ चेंडूत १५१ तर मॅडी ग्रीनने ७७ चेंडूत १२१ धावा केल्या. त्यांच्या याच शतकी खेळीच्या जोरावर न्युझीलॅंडने ५० षटकांत तब्बल ४९० धावा कुटल्या.
यानंतर फलंदाजीला आलेल्या आयर्लंड संघाला ३५.३ षटकांत सर्वबाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली.
या सामन्यात असे काही विक्रम पहायला मिळाले जे पुरुषांच्या क्रिकेटमध्येही कधी झाले नाहीत. त्यातील काही खास विक्रम-
-३४६ धावा: महिलांच्या क्रिकेटमधील हा चौथा सर्वात मोठा विजय. ४०८ धावांनी न्युझीलॅंडनेच पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवला होता.
-११९ धावा: महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा. काल आयर्लंडच्या कॅरा मरेला या धावा काढण्यात आल्या. काल एकाच सामन्यात आयर्लंडच्या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी ९२ धावा देत एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसरे ते पाचवे स्थान पक्के केले.
-४९० धावा: पुरुषांच्या तसेच महिलांच्या वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या. या यादीत ४५५धावांसह दुसऱ्या स्थानावरही न्युझीलॅंडच्या महिलांचाच संघ आहे.
-४९० धावा: या पुरुषांच्या तसेच आंतरराष्ट्रीय युवा क्रिकेट तसेच महिलांच्या क्रिकेटमधील सर्वोच्च धावा आहेत.
-४५० धावा: जागतिक क्रिकेटमध्ये दोन वेळा ४५० पेक्षा अधिक धावा वनडेत करणारा न्युझीलॅंडच्या महिलांचा संघ एकमेव
-४ वेळा: महिलांच्या क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या ४ गोलंदाजांनी ९० पेक्षा जास्त धावा दिल्या. कालच्या सामन्यापुर्वी महिलांच्या वनडेमधील तब्बल १११४ सामन्यात केवळ १ वेळा ९० पेक्षा जास्त धावा देण्यात आल्या होत्या.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण