fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विश्वचषकासाठी निवड होऊनही एकाही सामन्यात संधी न मिळालेले भारताचे अभागी खेळाडू

कोणत्याही खेळाडूला आपण राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करावे, देशाला विश्वचषक जिंकुन द्यावा, असे वाटत असते. त्यामुळे विश्वचषक संघात निवड व्हावी, यासाठी खेळाडू प्रचंड मेहनत घेतात.

भारतीय संघाने 2007 साली जगात पहिल्यांदाच झालेल्या टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय संघ टी-20 मध्ये एक प्रमुख संघ राहिला आहे.

2007 नंतर 2009, 2010, 2012, 2012 आणि 2016 पर्यंत 5 असे एकूण 6 टी-20 विश्वचषक खेळवण्यात आले आहेत. परंतु, भारताने फक्त पहिलाच टी-20 विश्वचषक जिंकला असून त्यानंतर संघाला अशी कामगिरी करता आली नाही.

“भारतातील कोणत्याही खेळाडूला आपण राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करावे, असे वाटते. त्यातही आपण देशाला विश्वचषक जिंकु द्यावा, असेही वाटत असते. त्यामुळे विश्वचषक संघात निवड व्हावी, यासाठी खेळाडू प्रचंड मेहनत घेत असतात.” मात्र, भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एक नोंद अशीही आहे, ज्यात काही खेळाडूंची विश्वचषक संघात निवड होऊनही त्यांना ‘प्लेइंग इलेव्हन’ म्हणून मैदानावर खेळण्याची संधी मिळालेली नव्हती.

या लेखात आपण असे दहा खेळाडू पाहणार आहोत, ज्यांची वेगवेगळ्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. परंतु, त्यांना त्या संपूर्ण स्पर्धेत प्रमुख अकरा खेळाडूंपैकी एक म्हणून प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची संधी मिळालीच नाही.

यापैकी 2007, 2010 आणि 2012 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी एक खेळाडू, 2009 आणी 2014 मध्ये प्रत्येकी दोन खेळाडूंना प्रमुख अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. तर 2016 मध्ये झालेल्या विश्वचषकात सर्वाधिक 3 खेळाडूंना प्रत्यक्ष ‘प्लेइंग इलेव्हन’ म्हणून मैदानावर सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

“विश्वचषक स्पर्धेसाठी भारताकडून साधारण 15 खेळाडूंची निवड केली जाते. हे 10 खेळाडू त्यावर्षीच्या विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट होते. मात्र, ते कधीही ‘प्लेइंग इलेव्हन’पैकी एक बनू शकले नाहीत.”

पाहा भारताच्या त्या दहा खेळाडूंची नावे आणि संबंधीत टी-20 विश्वचषकाची गाथा…

  • टी-20 विश्वचषक – 2007 : पियुष चावला

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, रोहित शर्मा, यूसुफ पठान, हरभजन सिंह, आर.पी. सिंह, एस. श्रीसंत, इरफान पठान, अजित आगरकर, पियुष चावला आणि जोगिंदर शर्मा.

“दक्षिण आफ्रीका येथे झालेला हा पहिला टी-20 विश्वचषक, भारताने पाकिस्तानला हरवून आपल्या नावावर केला होता.”

भारताने या टी-20 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. परंतू, त्यापैकी फक्त 14 खेळाडूंना प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळाली. लेग स्पिनर पियुष चावला, हा त्या संपुर्ण स्पर्धेत एकही सामना खेळला नव्हता.

  • टी-20 विश्वचषक – 2009 : दिनेश कार्तिक आणि प्रवीण कुमार

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, यूसुफ पठान, रविंद्र जडेजा, हरभजन सिंह, प्रज्ञान ओझा, आर.पी. सिंह, इरफान पठान, झहीर खान, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक आणि प्रवीण कुमार.

2009 साली दुसरी टी-20 विश्वचषक स्पर्धा इंग्लंड येथे झाली होता. मात्र, या स्पर्धेत गत विजेत्या भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब झाली होती.

विश्वचषकासाठी निवडलेल्या भारताच्या 15 सदस्यीय संघातील फक्त 13 खेळाडूंना तेव्हा प्रत्यक्ष ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. तर दोन खेळाडूंना संपुर्ण स्पर्धेत मैदानाबाहेर बसावे लागले होते.

विरेंद्र सेहवागच्या जागेवर संघात समावेश करण्यात आलेला दिनेश कार्तिक आणि जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार, हे दोघेही संपुर्ण स्पर्धेत एकही सामना खेळले नाहीत.

  • टी-20 विश्वचषक – 2010 : उमेश यादव

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, मुरली विजय, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, यूसुफ पठान, रविंद्र जडेजा, आशिष नेहरा, पियुष चावला, हरभजन सिंह, झहीर खान, सुरेश रैना, विनय कुमार आणि उमेश यादव.

तिसरी टी-20 विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडीज येथे झाली होती. 2009 च्या विश्वचषकाप्रमाणे 2010 मध्ये देखील भारतीय संघ सुमार कामगिरीमुळे स्पर्धेतून दुसऱ्या टप्प्यात बाहेर फेकला गेला.

तसे पाहता तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडूला पहिल्या टप्प्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, पहिला टप्पा पुर्ण झाल्यानंतर प्रवीण कुमार संघाबाहेर गेल्याने त्याच्या जागेवर उमेश यादवचा समावेश करण्यात आला होता. परंतु, त्यानंतर झालेल्या एकाही सामन्यात उमेश यादवाला ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी मिळाली नाही.

  • टी-20 विश्वचषक – 2012 : मनोज तिवारी

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना, इरफान पठान, रविचंद्रन अश्विन, पियुष चावला, लक्ष्मीपती बालाजी, हरभजन सिंह, अशोक डिंडा, झहीर खान आणि मनोज तिवारी.

श्रीलंका येथे 2012 सालची टी-20 विश्वचषक स्पर्धा झाली होती. मात्र, यावर्षी देखील भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला होता. त्या वर्षी विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघातील 15 सदस्यांपैकी फक्त मनोज तिवारी या खेळाडूला संपुर्ण स्पर्धेत कोणताही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

  • टी-20 विश्वचषक – 2014 : वरुण आरोन आणि स्टुअर्ट बिन्नी

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा, वरुण आरोन आणि स्टुअर्ट बिन्नी.

बांग्लादेश येथे 2014 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, श्रीलंकेकडून भारताला पराभव स्विकारावा लागला होता.

त्यावर्षी विश्वचषकात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि जलदगती गोलंदाज वरुण आरोन यांना संपुर्ण स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

  • टी-20 विश्वचषक – 2016 : भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंह आणि पवन नेगी

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, आणि पवन नेगी.

2016 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश भारत होता. भारताने स्पर्धेत 4 पैकी ३ सामने जिंकत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, भारतीय संघाला उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज संघाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

या विश्वचषक स्पर्धेत तब्बल तीन खेळाडू असे होते, जे संपुर्ण स्पर्धेत ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत. ते तीन खेळाडू म्हणजे, हरभजन सिंह, पवन नेगी आणि भुवनेश्वर कुमार हे होते.