---Advertisement---

सीमारेषेच्या आत आहे क्रिकेट मैदानावर झाडं, यावर शतक मारल्यावर गांगुलीला झाली होती शिक्षा

On: गुरूवार, जुलै 16, 2020 12:51 PM
---Advertisement---

क्रिकेटची मैदाने आपल्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक मैदाने अतिसुंदर तर काही जराशी विचित्र पद्धतीची असतात. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लॉर्ड्स मैदान त्याच्यावर असलेल्या तीव्र उतारामुळे Slope या नावाने ओळखले जाते. न्यूझीलंडमधील क्वीन्सटाऊन मैदान विमानतळाच्या अगदी समोर आहे. प्रवाशांसाठी ती अनेकदा पर्वणीच असते.

काही मैदानांमध्ये तर झाडे देखील आहेत. मैदानावर म्हणजे खेळण्याच्या क्षेत्रात (प्लेईंग एरियामध्ये) ही झाडे आहेत. येथे आपण अशा उल्लेखनीय क्रिकेट मैदानांवर नजर टाकूया.

सेंट लॉरेन्स ग्राउंड, केंट

सेंट लॉरेन्स मैदान हे केंट क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे. सीमारेषेच्या आतमध्ये २७ मीटर उंच लाईमचे एक झाड होते. तथापि, २००५ मध्ये ते वाळवीमुळे दुर्बल झाल्यानंतर चक्रीवादळात ते पडले.

२०० वर्ष जुन्या पडलेल्या झाडाच्या जागेवर नवीन लाइमचेच झाड लावण्यात आले. यावेळी देखील हे झाड प्लेईंग एरियाच्या आत परंतु सीमारेषेच्या बाहेर लावण्यात आले.

पीटरमारिट्जबर्ग, दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेतील हे शहर महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याचे जन्मस्थान आणि झाडांचे क्रिकेट मैदान म्हणून प्रसिद्ध आहे.

चेंडू झाडावर आदळल्यास काय होते? घटनास्थळाच्या नियमांनुसार, चेंडू कुठल्याही प्रकारे झाडाला लागला की, चार धावा दिल्या जातात.

२००३ च्या विश्वचषकात या मैदानावर दोन आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले होते. १४ फेब्रुवारी २००३ रोजी बांगलादेश व श्रीलंका येथे पहिला वनडे सामना खेळले होते. याच सामन्यात पहिल्या तीन चेंडूवर चामिंडा वासने बांगलादेशच्या ३ खेळाडूंना तंबूत पाठवत हॅट्रिक घेतली होती तर संपुर्ण बांगलादेश १२४ धावांवर सर्वबाद झाला होता.

दुसरा सामना २३ फेब्रुवारी २००३ रोजी येथे झाला होता. यात भारताने नामिबीयावर १८१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात सचिनने १५२ तर सौरव गांगुलीने नाबाद ११२ धावा केल्या होत्या. यानंतर सौरव गांगुलीचे येथे झाडं लावतानाचे फोटो तेव्हा वृत्तपत्रांमध्ये आले होते.

या मैदानाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जो खेळाडू शतक ठोकतो किंवा पाच विकेट्स घेतो, त्याला मैदानात झाड लावायला मिळते.

ऍम्सटेलवीन, नेदरलँड्स

ऍम्सटेलवीनच्या व्हीआरए क्रिकेट मैदानावर काही आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात १९९९ विश्वचषकातील एक सामना आणि २००४ मध्ये भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्हिडीओकॉन चषकाचा समावेश होता.

मैदानाच्या प्लेईंग एरियामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहे. नेदरलँड्सने या मैदानावर गेल्या दीड दशकापासून आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केलेले नाहीत.

वाचनीय लेख –

‘सर’ पदवी मिळालेले ५ दिग्गज क्रिकेटपटू

असे ५ क्रिकेटपटू ज्यांनी सिद्ध केले वय हा केवळ एक आकडा आहे

५ क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले आहे यष्टीरक्षण, पण अनेकांना माहितीही नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---